आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामोजी फिल्मसिटीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे - रामोजी फिल्मसिटीचे सीईओ जालनापूरकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हैदराबादनजीक१८०० एकरवर उभारलेल्या रामोजी फिल्मसिटीत दरवर्षी २०० चित्रपट बनत असून, १८ लाख पर्यटक भेट देतात. त्या पर्यटकांपैकी ३० टक्के म्हणजे सुमारे ते लाख पर्यटक महाराष्ट्रातून येतात. सध्या तिथे ८,५०० कर्मचारी काम करत असून, त्यातील १५०० आपल्या महाराष्ट्रातील असल्याचे रामोजी फिल्मसिटीचे सीईओ राजीव जालनापूरकर यांनी सांगितले.

शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोअर्सच्या वतीने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत रामोजी फिल्म सिटीत महत्त्वाचे योगदान देत असलेले महाराष्ट्राचे भूमिपुत्र राजीव जालनापूरकर यांचे विचारपुष्प शनिवारी गुंफण्यात आले. या वेळी बोलताना जालनापूरकर यांनी या फिल्मसिटी निर्मितीच्या प्रारंभापासूनचा इतिहास उपस्थितांसमोर विशद केला. रामोजीरावांना एक भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाची जीम बनवायची असल्याने त्या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून त्यांनी मला भेटायला बोलावले. प्रत्यक्षात जेव्हा कामाला प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या जागतिक दर्जाच्या संकल्पनांमुळे त्यांची कामाबद्दलची पॅशन मला अधिक प्रकर्षाने जाणवली. जेव्हा जीम बांधून पूर्ण झाली, त्यावेळी त्यांना जीम आणि माझी कामाची पध्दती आवडल्याने आमचे सूर चांगले जुळले. त्यातूनच मग पुढे फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी कोअर टीम स्थापन केली गेली. या आठ जणांच्या कोअर टीममध्ये माझा समावेश करण्यापासून या प्रवासाला प्रारंभ झाल्याचे सीईओ राजीव जालनापूरकर नमूद केले.
रामोजी फिल्मसिटीत नवनवीन थीमअंतर्गत आता युरेका, वाइल्डवेस्ट, आलमपनाह, बोन्साय गार्डन, बटरफ्लाय पार्क, विदेशी पक्ष्यांचा पार्क, इको पार्क आणि अॅडव्हेंचर पार्क अशा एकाहून एक सरस वैविध्यपूर्ण संकल्पनांवरील पार्क तसेच, ११० अफलातून उद्यानांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रकल्पाच्या निर्मितीत महाराष्ट्रातील तंत्रज्ञ आणि कलाकारांचे मोठे योगदान असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, राजाभाऊ मोगल, आनंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला. जयंत खैरनार यांनी आभार मानले.

पर्यटनाचा नव्हता विचार
याप्रकल्पात प्रारंभी केवळ चित्रपट निर्मितीचाच विचार होता. त्यात प्री आणि पोस्टप्रॉडक्शनचाही अंतर्भाव करण्यात आला होता. मात्र, नागरिकांची हजारोंनी पत्रे रामोजीराव यांना येऊ लागल्यानंतर ही फिल्मसिटी नागरिकांना पर्यटन म्हणूनदेखील खुली करण्याचा विचार पुढे आल्याचेही त्यांनी नमूद केले. या फिल्मसिटीत मराठीसह तेराही भाषांतील चित्रपट बनत असून नुकताच बनलेला बाहुबलीदेखील रामोजीतच चित्रीत झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...