आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘महासागर’ने घेतला प्रेक्षक मनाचा वेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जयवंत दळवींचे ‘महासागर’ हे नाटक तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले. कालिदास कलामंदिर येथे रविवारी या नाटकाचा सादर झालेल्या प्रयोगाने प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतला. या नाटकानिमित्त पुन्हा एकदा नाशिककरांना आशालता वाबगावकर, शैलेश दातार, सुबोध भावे आणि नाशिकची अनिता दाते यांसारख्या कलाकारांचा सशक्त अभिनय बघावयास मिळाला.
माणसागणिक संसाराच्या व्याख्या बदलतात. प्रेमाच्या भाषा बदलतात. त्यात विवाहेतर संबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखीनच वेगळा. ‘महासागर’ या आशयाभोवती साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळात वावरते.
नाटकातील सुमी व तिचा उच्चभ्रू नवरा एक सुखी दांपत्य पण मोहाच्या क्षणी विवाहेतर संबंधाला बळी पडलेल्या सुमीची ही चूक घनश्याम (शैलेश दातार)च्या लक्षात येते आणि त्यांचा संसार मोडकळीस येतो. या दोघांना सावरणारा घनश्यामचा मित्र वीरप्पा (सुबोध भावे) आणि त्याची घरकामातच सुख शोधणारी बायको चंपू (अनिता दाते) यांचे एक वेगळेच विश्व. हे नाटक वीस वर्षांपूर्वीचे असले तरी त्यातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा आशय समकालीन आहे.
भूमिकेला न्याय दिला
मी माझ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे नाटकातील भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील मला वा वीरप्पाला बसणारा धक्का आज तितक्या तीव्रतेचा राहिलेला नसला तरी आजही या नाटकाचा आशय व परिस्थिती टिकून असल्याने रिलेट होतो हेच या भूमिकेचे यश आहे. शैलेश दातार, अभिनेता
खूप काही शिकवले
एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मी माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. दळवींच्या या नाटकाने मला खूप काही शिकवलं, अगदी आपण आजही शिकण्याच्याच भूमिकेत आहोत याची जाणीव होईस्तोवर मी या नाटकातून शिकलो. सुबोध भावे, अभिनेता
नाटकास प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघण्यासाठी दिग्दर्शक नीना कुलकर्णी सभागृहात अगदी मागच्या रांगेत येऊन बसल्या होत्या. नाटक बघताना त्यांचे प्रेक्षकांकडे लक्ष होते. नाटक संपल्यानंतर ग्रीनरुममध्ये शिरताना ‘नाशिककरांचा प्रतिसाद खरोखरच अप्रतिम होता’ असे म्हटल्याखेरीज त्यांना राहवले नाही.