आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- ‘नगररचनावाल्यांनी दोन दिवसांनी यायला सांगितलं होतं. काल सुटी असेल म्हणून आज आलो तर महापालिका बंद...’ हे हताश उद्गार होते मनपातील कामासाठी आलेल्या नितीन शिंदे या नागरिकाचे, तर ‘दादा आता काय करावं? 80 रुपये यायाला लागले, आणखी 80 जायाला लागतील. पोरांच्या शाळंसाठी अर्ज घ्यायला आलो हुतो. आता पुन्हा यावं लागंल...’ असा मनस्ताप आणि निराशा दिंडोरीहून 30 किलोमीटर लांब असलेल्या वनारं या गावचे सदू अमृता चव्हाण यांनी व्यक्त केली.
अधिसूचनेमध्ये शासनाने जाहीर केलेल्या चुकीच्या सुटीचा फटका बुधवारी सामान्य नागरिकांना सहन करावा लागला. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक त्यांच्या कामासाठी येणे दिवसभर अव्याहतपणे सुरू होते. मात्र, कार्यालयांबाहेर लागलेल्या ‘आज कार्यालयाला सुटी आहे’ या फलकाने हजारो नागरिकांना वेळ वाया गेल्याचा मनस्ताप आणि ग्रामीण भाागातून आलेल्या नागरिकांना तर आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागला.
विभागीय कार्यालयातही गर्दी : नाशिकरोड येथील शासकीय कार्यालयात गेलेल्या नागरिकांना बंद दरवाजा बघून माघारी फिरावे लागले, येथे महसूल, शिक्षण, कृषी विभागासह अनेक महत्त्वाची विभागीय कार्यालये आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांतून कामासांठी शेकडो रुपये खर्च करून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सुटी कशी दिली
दादा ओझरहून महापालिकेतल्या कामासाठी आलो होतो. आता तसंच परत जावं लागतंय. ही सुटी आज कशी काय दिली? काहीच समजत नाही.
-निर्मला अशोक साळवे आणि सविता मिलिंद साळवे
वेळ वाया गेला
सोमवारी महावीर जयंतीची सुटी असल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आज आले. मात्र येथे समजली की सुटी आज आहे. यामुळे माझा वेळ वाया गेला आहे.
-दमयंतीबाई शिंदे
आरटीओत एजंट गायब; सामान्यांची मात्र गर्दी
आरटीओ कार्यालयात वाहन अनुज्ञाप्तीपासून तर नोंदणीपर्यंतची कामे करण्यासाठी सर्वसामान्यांची नेहमीप्रमाणे गर्दी झाली; मात्र या सुटीची कल्पना असल्यामुळे नेहमी वावरणार्या एजंटची व त्यांच्या पाठीमागे फिरणारे जत्थेच्या जत्थे दिसत नव्हते. आरटीओ कार्यालयाचे कामकाज सकाळी 10.30 वाजता सुरू होते. त्यामुळे 11 वाजता विविध प्रकारचे परवाने देणार्या बाह्य खिडक्यांजवळ तुरळक गर्दी दिसत होती.
कॅलेंडरमध्ये मंगळवारीच सुटी
कॅलेंडरवर मंगळवारीच महावीर जयंतीची सुटी दाखविल्याने आज पालिकेत कामासाठी आलो, पण आता परत जावं लागेल.
-मजाज कोकणी
बुधवारी येण्यास सांगितले
रेकॉर्ड कार्यालयात कामासाठी सय्यद पिंप्रीहून सोमवारी आलो तेव्हा सुटीमुळे बुधवारी येण्यास सांगितले; मात्र आज आलो तर कार्यालय बंद.
-फकिरा त्र्यंबक ढिकले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.