आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात महिंद्रातील कामगारांचे ‘काम बंद’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतील कामगारांचे आंदोलन मंगळवारी चिघळले. वेतनवाढ कराराच्या अनुषंगाने सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. त्यातच बेमुदत उपोषणास बसलेले कंपनीच्या अंतर्गत कामगार संघटनेचे सचिव प्रवीण शिंदे आणि उपाध्यक्ष अमोल शिंदे यांना मंगळवारी निलंबनपूर्व चौकशीची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे ही नोटीस मागे घेईपर्यंत व्यवस्थापनाशी कुठलीच बोलणी न करण्याची भूमिका कामगार नेत्यांनी घेत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

वेतवाढ करार करावा, समान काम- समान वेतन याप्रमाणे कामगारांना किमान 36 हजार रुपये वेतन द्यावे, 32 वर्षांपासून कायम असलेला वेतन आराखडा बदलावा, या मागण्यांसाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा एम्प्लॉईज युनियनने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, कंपनी प्रशासनाने कामगार युनियनशी बोलणी करण्यासाठी दुपारी 3.30 वाजता महिंद्रा हाउस येथील अश्विनी गेस्ट हाउसवर बैठक आयोजित केली होती. यापूर्वीच शिंदे आणि सोनवणे यांना नोटीस मिळाल्याने कामगार संतप्त झाले. त्यानंतर दुपारी नियोजित बैठक झाली. यात वेतनवाढ कराराची बोलणी करण्याबाबत अधिका-यांनी कामगार संघटनेच्या नेत्यांना आवाहन केले. मात्र, जोपर्यंत निलंबनप्रक्रिया मागे घेतली जात नाही तोपर्यंत कुठलीही बोलणी करण्यास नेते तयार झाले नसल्याने बैठकीचा काहीच उपयोग झाला नाही.

कंपनी व्यवस्थापन बोलणीस तयार
प्रवीण शिंदे आणि अमोल सोनवणे यांनी 3 मार्च रोजी पहिल्या पाळीतील उत्पादन चार तास बंद पाडले. त्यामुळे त्यांच्या निलंबनपूर्व चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी व्यवस्थापनाने बैठकही बोलाविली होती. त्यावर युनियनने बहिष्कार टाकला, काम बंद आंदोलन पुकारले. व्यवस्थापन कामगार संघटनेशी बोलणी करण्यास तयार आहे.
अनिल गोडबोले, महाव्यवस्थापक, एचआर विभाग, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा