आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्र वेतनवाढप्रश्नी बुधवारची बैठक निष्फळ; कुटुंबीयही आंदोलनात सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सातपूर येथील महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनीतील कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात वेतनकरारप्रश्नी बुधवारी कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक होणार असून, या बैठकीत होणार्‍या निर्णयावरच कंपनीचे नाशिकमधील भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा उद्योग जगतात सुरू आहे.

कामगार उपायुक्त रा. सु. जाधव यांच्या दालनात सकाळी 11 वाजेपासून वेतनकरारावर तोडगा काढण्याकरीता बैठक सुरू होती. दीड तास चाललेल्या या बैठकीत व्यवस्थापनाने युनियनकडे काम वाढवून द्या आणि वेतनवाढ घ्या अशी भूमिका कायम ठेवली, त्यावर व्यवस्थापन जे काम वाढवून मागते आहे ते मानवी क्षमतेबाहेरील असल्याचे कामगारांनी स्पष्ट करीत काम वाढवून देणे शक्य नसल्याचे सांगितले. यामुळे कोणताही सन्मान्य तोडगा निघाला नाही. दरम्यान युनियनचे उपाध्यक्ष अमोल सोनवणे आणि जनरल सेक्रेटरी प्रविण शिंदे यांचे आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण कायम आहे.

या बैठकीला कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर उपस्थित नव्हते त्यांच्या वतीने इ. आर. व्यवस्थापक अनिल गोडबोले, जितेंद्र कामठीकर, नासीर देशमुख हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नसल्याने पुन्हा गुरूवारी सकाळी बैठक होणार आहे. दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून कामगारांचे कुटुंबीयही उपोषणस्थळी येणार असून, आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.