आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra And Mahindra Employee Strike Issue At Nashik

महिंद्रातील ‘टूल डाउन’ दुसर्‍या दिवशीही सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिंद्रा अँड महिंद्रा कामगारांचे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरू राहिले. व्यवस्थापनाने युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्याने संयुक्त कामगार कृती समितीसह कामगार विकास मंचच्या नेत्यांनी ‘टूल डाउन’चा निर्णय कायम ठेवला. शहरातील दोन्ही प्लँटमधील कामकाज बुधवारीही ठप्प राहिल्याने 500 गाड्यांचे उत्पादन होऊ शकले नाही. मात्र, तीन आठवडे पुरेल इतका वाहनांचा साठा उपलब्ध असल्याने विक्रीवर आंदोलनाचा परिणाम झालेला नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

यासंदर्भात कामगार आणि व्यवस्थापनाच्या वतीने दिवसभर प्रयत्न सुरू राहिले. निलंबन मागे घेतल्याशिवाय व्यवस्थापनाशी बोलणी करायची नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतल्यानंतर संयुक्त कामगार कृती समिती व कामगार विकास मंचच्या प्रतिनिधींनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह पदाधिकार्‍यांची भेट घेत मध्यस्थी करण्याची मागणी केली. सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि कामगार विकास मंचचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी कामगारांची बाजू मांडली. वेतन करारावेळीच असे निलंबन करणे चुकीचे असून उद्योजकांनी ते थांबवले पाहिजे, असे मत कामगार नेत्यांनी व्यक्त केले.

कामगार उपायुक्तांकडे आज बैठक : कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी सायंकाळी कामगार नेत्यांशी चर्चा केली. नेत्यांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनाशी बोलणी केली. आता तोडगा काढण्यासाठी जाधव यांच्या दालनात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता बैठक होणार आहे.

सकारात्मक पाऊल : डॉ. कराड तीस वर्षांत पहिल्यांदाच बुधवारी निमा हाऊसची पायरी चढले. कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सामंजस्याने चर्चा घडवून आणण्यासाठी निमाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी ते अध्यक्ष बेळे यांना भेटले. सध्या एमआयडीसीतील बहुतांश उद्योगांत वेतनवाढ करार सुरू असून त्यावर या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी सामंजस्याने प्रश्न सोडवण्यावरच चर्चेत सर्वांचा भर राहिला.