आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राकडून मोटार निर्मितीसाठी वापरले जातेय पुनर्प्रक्रिया केलेले पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँण्ड महिंद्रा या मोटार निर्मिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने राबविलेला रेन वॉटर हार्वेस्टिंगव्दारे पावसाचे पाणी साठवायचे आणि सांडपाणी प्रक्रियेव्दारे त्याच पाण्याचा पुनर्वापर करायचा या उपक्रमाचा आदर्श इतर कारखान्यांनाही मार्गदर्शक ठरतो आहे.

महिंद्रा अँण्ड महिंद्राचे अकरा युनिट आहेत. सन 2005 मध्ये सर्व युनिटसाठी दिवसाला अठरा लाख लिटर पाण्याचा वापर व्हायचा. एका गाडीच्या उत्पादनासाठी 6,230 लिटर पाण्याचा वापर व्हायचा. कंपनी व्यवस्थापनाने पाणी वापरावर बचतीव्दारे मात करण्याचा मार्ग निवडला. त्यात, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कंपनीच्या आवारात अकरा लाख लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात आले. प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी सहा ते सात लाख लिटर पाणी कंपनीच्या कामासाठी वापरले जात आहे. याशिवाय कंपनीच्या आवारातील उद्याने, स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर केला जातो. कंपनीतील अग्निशामक दल व फोरक्लिप मशीन स्वच्छ करण्यासाठीही याच पाण्याचा वापर केला जातो.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर केल्यानंतर बचतीचा भाग म्हणून जलवाहिन्यांची गळती शोधून ती बंद करण्यात आली. 2008 पासून रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविण्यात येऊ लागली, त्यातून चाळीस लाख लिटर पाणी साचविले जाते. गेल्या आठ वर्षांची तुलना करता सन 2005 मध्ये एका गाडीला 6,230 लिटर पाणी लागायचे तेच पाणी वापराचे प्रमाण आता 1,430 लिटरपर्यंत खाली आले आहे. एकंदरीतच पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने 76 टक्के पाणी बचत शक्य झाली आहे.