आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटाघाटीनंतर महिंद्रा कामगारांचे आंदोलन मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील उद्योगांची मदर इंडस्ट्री संबोधल्या जाणार्‍या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगारांचे आंदोलन तिसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी मिटले. कामगार उपायुक्त रा. सु. जाधव यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे महिंद्रा व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात लेखी करार झाला. यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर हे आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले असून कंपनीतील कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे.

कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद सामंजस्याने मिटावा यासाठी कामगार उपायुक्त रा. सु. जाधव यांनी संयुक्त बैठक घेतली. बैठकीत युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे आणि उपाध्यक्ष उपाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याबरोबरच 15 एप्रिलपूर्वी वेतन करार करण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखवली. एन-वन वर्गवारीतील कर्मचार्‍यांनाही वेतन करारात समाविष्ट करावे यांसारख्या विषयांवर 15 एप्रिलपूर्वी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगार युनियनने आंदोलन मागे घेतले. व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक अनिल गोडबोले, मोहनकुमार, नासीर देशमुख आदींनी सहभाग घेतला. यावेळी कंपनीतील अनेक कामगारांची उपस्थिती होती.

सामंजस्य महत्त्वाचे
कामगारांनी आंदोलन करण्यापूर्वी कामगार उपायुक्त कार्यालयाला माहिती दिली असती तर हे आंदोलनच घडले नसते. कोणत्याही कंपनीत काही प्रश्न असतील त्यांनी थेट आमच्या कार्यालयाशी बोलल्यास तोडगा निघू शकेल. - रा. सु. जाधव, कामगार उपायुक्त.