आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गढीवरील मशिदीच्या पुनर्बांधणीचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काझी गढीवरील मशिदीचा काही भाग अत्यंत धोकेदायक झाला असल्यामुळे तो पडण्याची भीती स्थानिकांमध्ये होती. येथील धोकेदायक भिंतीची पाहणी बुधवारी शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन साहब खतीब, मुस्लिम समाजाचे प्रवक्ते हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी व पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केली. या वेळी गुरुवारी मशिदीच्या भिंतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काझी गढी परिसरातील काही भाग मुसळधार पावसामुळे खचत चालला आहे. या परिसरातील रहिवाशांच्या स्थलांतरासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. याच काझी गढीवर मुघल काळापासून असलेल्या मशिदीचा काही धोकेदायक भागदेखील कोसळण्याच्या मार्गावर आहे. या भागाची डागडुजी करून तिची पुनर्बांधणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
मात्र, मशिदीची देखरेख व इतर निर्णय हे शहर-ए-खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतात. त्यामुळे शहर-ए-खतीब यांनी बुधवारी काझी गढी परिसरातील मशिदीसह इतर धोकेदायक
ठिकाणांची पाहणी करून मशिदीचा धोकेदायक भाग गुरुवारी उतरवून पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इतर ठिकाणांसाठीही लवकरच जिल्हाधिकारी तसेच, पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे हाजी मीर मुख्तार यांनी सांगितले.
या वेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते.

मुघल काळात बांधकाम...
काझी गढी येथील मशीद ही सुमारे 400 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. मुघल काळात जुने दगड व चुन्याचा वापर करून या मशिदीचे बांधकाम करण्यात आले आहे. ही मशीद नाशिक शहरातील पहिली मशीद असल्याचा अंदाज मीर मुख्तार यांनी या वेळी व्यक्त केला.

‘नरसिंहा’चे चित्रीकरण
काझी गढी परिसरात 1986 मध्ये ‘नरसिंहा’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. गढीवरील मशिदीजवळच्या चाळीत अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचे घर दाखविण्यात आले होते. याच ठिकाणी सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांची भेट दाखविण्यात आली होती.
काझी गढीवरील मशिदीची पाहणी बुधवारी शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन साहब खातीब यांनी केली. या वेळी मुस्लिम समाजाचे प्रवक्ते हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी व पोलिस निरीक्षक मधुकर कड आदी उपस्थित होते.