आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रेय कंपनीकडून घेतले पैसे परतीचे हमीपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी मैत्रेय कंपनीकडून पोलिसांनी प्रतिज्ञापत्र घेतले आहे. ते २ जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अाजवर अनेक ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपली तरी त्यांना पैसे परत मिळालेले नाहीत. तर काहींना कंपनीने दिलेले चेक अनादरित झाले अाहेत. मात्र अद्याप यापैकी बहुतांश ठेवीदारांनी पाेलिसात तक्रार दिलेली नाही. अशा गुंतवणूकदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कंपनीकडून हे प्रतिज्ञापत्र घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या अंतरिम जामीन अर्जास न्यायालयाने २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली अाहे. त्याच दिवशी सुनावणीदरम्यान तक्रारदार १२५ गुंतवणूकदारांच्या यादीवर निर्णय होणार अाहे. न्यायालयात तपासी अधिकारी आणि सरकारी वकील अॅड. पंकज चंद्रकोर यांनी गुंतवणूकदारांच्या रकमांच्या वाटपाबाबत ठाेस निर्णय झाल्याशिवाय जामिनाबाबत काेणतीही भूमिका घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. त्यावर कंपनी कशा प्रकारे रक्कम भरणार याबाबत अॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मैत्रेय कंपनीने विकत घेतलेल्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लिलाव करून रक्कम ठेवीदारांना परत करण्यासाठी एस्क्रो खात्यात रक्कम जमा करण्यासाठी प्रस्ताव कंपनीने सादर केला. तसेच एस्क्रो खात्यात अाजवर पाच कोटी ९ लाख रुपये जमा केले आहे.

मैत्रेय विराेधात अाजवर ७ हजार ४६ तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. यात १७ कोटी ६२ लाख ६३ हजार ३८६ इतक्या रकमेची फसवणूक झाली आहे. या सर्व ठेवीदारांच्या रकमा परत देण्यासाठी कंपनीने प्रतिज्ञापत्र द्यावे, असा युक्तिवाद अॅड. पंकज चंद्रकोर यांनी केला. यामुळे भविष्यातही ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कंपनी बांधिल राहणार आहे.

रकमांसाठी प्रतिज्ञापत्र
फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढत राहणार आहे. या ठेवीदारांची रकम परत मिळण्यासाठी कंपनीकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. २ जुलैला हे प्रतित्रापत्र सादर केले जाणार आहे. न्यायालयात अंतरिम अर्जावर सुनावणी होणार आहे. - अॅड. पंकज चंद्रकोर, सरकारी वकील
बातम्या आणखी आहेत...