आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरभ्र आकाश व्यापले पतंगांनी; तरुणांसह आबालवृद्धांचा सहभाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - नववर्षाच्या प्रारंभीच येणा-या पतंगोत्सवाचे स्वागत शहरवासीयांनी मोठ्या जल्लोषात केले. भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवशी आयोजित होणा-या पतंगोत्सवात आज दुस-या दिवशी घरोघरी मोठी गर्दी झाली. त्यातच रविवार हा सुटीचा दिवस आल्याने उत्साहात मोठी भर पडली होती.
मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी सकाळपासूनच शहरात घराघरांच्या गच्चींवर तरुणांनी गर्दी केलेली दिसून येत होती. त्यामुळे रंगीबेरंगी पतंगांनी आकाशच व्यापून गेले होते. आज पहाटेपासून पतंगप्रेमींनी कडाक्याच्या थंडीत घरांच्या गच्च्या गाठल्याचे दिसून आले. वा-यानेही चांगली साथ दिल्याने पतंग उडवण्याच्या उत्साहाला उधाण आले होते. प्रतिस्पर्धी पतंगप्रेमींच्या पतंग कापल्यावर ‘वक्काट, वक्काट’च्या आवाजाने आसमंत दुमदुमून गेला होता. लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत महिला, युवक, युवती, सर्वजण पतंगोत्सवात सामील झाल्याचे दिसून आले. शनिवारी रात्रभर मोठ्या पतंगोत्सवासाठी मांजा सुतण्यापासून ते पतंग खरेदी करण्यापर्यंत जय्यत तयारी केली होती. रविवारी संपूर्ण शहरच पतंगमय झाले होते.
येवल्याची प्रसिद्ध हलकडी वाद्य व ढोलताशांच्या गजरात दुपारनंतर पतंग उडवण्यास विविध ठिकाणी नागरिकांनी सुरुवात केल्याने संपूर्ण शहर गजबजल्याचे दिसून आले. सोमवारी पतंगोत्सवाचा शेवटचा दिवस असून, करीदिनी पतंगोत्सव उच्चांकाची पातळी गाठणार, अशी चर्चा सुरू होती. पतंग, दोरा, आसारी यासह पतंग उडवण्यासाठी हॅँड ग्लोव्हज, गॉगल्स, गॅस फुगे यांनाही पतंगप्रेमींची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. शहरातील विंचूररोडवरील गोशाळा मैदानावरील रासुरे या भटक्या जमातीच्या वस्तीत यंदाही सालाबादप्रमाणे आदर्श शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाण यांच्या वतीने शैक्षणिक स्वरूपातील पतंगांचे वाटप मुलांना माजी तालुका मास्तर रावसाहेब दाभाडे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते केसरसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. या पतंगांवर समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, कविता व कवीवीरांची, रंगांची, दिशांची, फुलांची, फळांची नावे, मराठी व इंग्रजी सुविचार, ग्रंथ व साहित्यिक दिशा, गणिताची सूत्रे आदी शैक्षणिक माहितीचे लेखन करण्यात आले होते.
लहान, थोरही झाले दंग - मालेगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन व विविध मंडळांच्या वतीने आयोजित पतंगोत्सवास लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सा-यांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅम्परोडवरील स्टार क्रिकेट मैदानावर हा उत्सव साजरा झाला. संक्रांतीनिमित्त घरांच्या छतावरून पतंग उडवणा-यांची संख्याही लक्षणीय होती.
स्टार क्रिकेट मैदानावर दुपारी 2 पासून या उत्सवाला सुरुवात झाली. यंदा पतंग तसेच त्यासाठी लागणा-या मांजाचे दरही वाढले. तरीदेखील मुलांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. शहरातील संगमेश्वर, सोयगाव, कॅम्परोड तसेच कॅम्प परिसरातील मोकळ्या जागा व घरांच्या छतांवर मुले पतंग उडवताना दिसत होती. रोटरी क्लब मिडटाऊनचे पदाधिकारी तसेच तुळजाभवानी मित्रमंडळ, एकात्मता चौक मंडळ, जनसेवा मित्रमंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. काही हौशी कुटुंबे घराच्या छतावरून पतंग उडवत होते. पतंगांचे पेचदेखील ठिकठिकाणी पाहावयास मिळाले. पतंगोत्सवामुळे संक्रांतीच्या गोडव्यात भर घातली. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची मालेगावी परंपरा नव्हती. मात्र, येवल्याच्या पतंगोत्सवाचा आदर्श घेत आता मालेगावीदेखील पतंग शौकिनांची संख्या वाढू लागली आहे.