आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगोत्सव अन् तीळगूळ वाटपाने संक्रांत साजरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मकरसंक्रांतीनिमित्त रविवारी शहरासह परिसरात तरुणाईने पतंग उडवण्याचा आनंद लुटत जल्लोष केला. विविध आकारांच्या रंगीबेरंगी पतंगांनी नाशिकचे आकाश दिवसभर व्यापून गेले होते. ‘काटा.. दे ढील..’च्या आरोळ्या दिवसभर निनादत होत्या. संध्याकाळपर्यंत पतंगोत्सवाची धूम सुरू होती. तरुणांबरोबरच मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही पतंग उडवण्याची मजा लुटली. सायंकाळी तीळगुळाचे वाटप करीत वर्षभर गोडवा ठेवण्याची ग्वाही देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून तपमान कमालीचे घसरले होते. मात्र, रविवारी वातावरण सुसह्य असल्याने नाशिककरांना उत्सवाचा मनमुराद आनंद लुटता आला. सकाळपासूनच गटागटाने गच्चीवर मित्र जमले होते. दुपारच्या सुमाराला या खेळाला आणखी रंगत चढली. आभाळात विहरणारे विविध रंगी-विविध ढंगी पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रविवारची सुटी असल्याने शासकीय नोकरदारांनाही या खेळात सहभागी होता आले.
स्नेह झाला वृद्धिंगत - दिवसभर पतंग उडवून थक लेल्या नाशिककरांनी संध्याकाळच्या सुमाराला पुन्हा उल्हसित होत आप्त-मित्रांना तीळगूळ वाटून स्नेह वृद्धिंगत केला. घरोघरी तीळगूळ वाटपाचा उत्साह दिसत होता. संध्याकाळच्या सुमाराला वाण देण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मंदिरामध्येही गर्दी दिसून आली.
पतंग उडवताना मजुराचा मृत्यू - देवळालीगाव येथील लिंगायत कॉलनीत पतंग उडवत असताना इमारतीवरून खाली पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मूळ बिहारमधील विशाल झा राम (वय 19) हा नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडवण्यासाठी गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास झोक जाऊन पडल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. संक्रांतीनिमित्त काम बंद असल्याने बांधकामाच्या ठिकाणी कोणीही नव्हते.