आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषभान निर्माण झाले तरच स्त्रीला सन्मान, स्त्रीवादी विचारवंत प्रा. छाया दातार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्त्रियांना पुरुषांसारखी समानता नको तर माणूस म्हणून समानता हवी, यासाठी समाजात पुरुषभान निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम स्त्रीवादी विचारवंत छाया दातार यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘भारतीय कुटुंब व्यवस्था - काल, आज आणि उद्या’ या विषयावर प्रा. छाया दातार यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. दातार यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येत नसल्याचे सांगितले. कष्टात महिला अग्रेसर असताना वास्तवावर श्रमाचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे महिला कमी श्रमाचे काम करतात, असा समज पसरला आहे. हा समज दूर करण्यासाठी आजच्या स्री-पुरुषांनी एकत्र येऊन नवा समाज घडविण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या. घटस्फोटीत, विधवा, अविवाहिता कुटुंबात राहात असल्या तरी त्यांचे असंख्य प्रश्न आहेत. अलीकडे लिंगभेद निदान चाचण्यांमुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत प्रा. दातार यांनी आपणच आपली कुटुंब व्यवस्था बदलायला हवी, स्री-पुरुष समानतेत लैंगिक संबंध सुधारणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांना जीवनात केवळ उपेक्षाच आली असे ते म्हणाले. अध्यासनातर्फे जेंडर ऑडिट करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. दरम्यान, प्रारंभी विद्यापीठाच्या वतीने तयार केलेल्या सावित्रीबाई फुले संवाद विशेषांकाचे ऑनलाइन प्रकाशनही प्रा. दातार यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे माधुरी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक आभार सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...