आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malegaon Blast: After 5 Years In Jail, Charges Dropped Against 9 Muslim Men

नऊ युवकांच्या सुटकेने मालेगावमध्ये जल्लाेष; जनता दलाने काढली मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव (जि. नाशिक)- सन २००६ मध्ये मालेगावात झालेल्या साखळी बाॅम्बस्फाेट प्रकरणात सहभागाचा अाराेप असलेल्या नऊ जणांची मंगळवारी मुंबईच्या विशेष मकाेका न्यायालयाने निर्दाेष सुटका केली. जनता दल कार्यकर्त्यांनी जल्लाेष व फटाक्यांची अातषबाजी करत या युवकांच्या सुटकेचा अानंद व्यक्त केला. खजूर व मिठाई वाटप करत शहरात विजयी मिरवणूकही काढण्यात अाली.
बाॅम्बस्फाेटानंतर तत्कालीन ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांनी मालेगावातील काेणत्याही धर्माचा नागरिक दहशतवाद निर्माण करू शकत नाही असा दावा केला हाेता. मात्र, स्थानिक तरुणांना जेव्हा अटक झाली तेव्हा १४ नाेव्हेंबर २००६ राेजी जनता दलाने मालेगाव बंद केले हाेते. एटीएसच्या तपासावर अाक्षेप घेत जद कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ ६९ दिवस धरणे अांदाेलन केले हाेते. दरम्यान सन २०१० मध्ये असीमानंद यांच्या वक्तव्याचा दुजाेरा देत जनता दलाने पुन्हा या बाॅम्बस्फाेट तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अटक केलेल्या संशयितांना जामिनावर साेडण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी २०३ दिवस चक्री धरणे अांदाेलन केले हाेते. २० अाॅक्टाेबर २०११ राेजी संशयितांची जामिनावर सुटका झाली. या वेळी पहाटे तीन वाजता या सर्वांचे स्वागत करत जनता दलाने अांदाेलन मागे घेतले हाेते. साेमवारी संशयितांची निर्दाेष झाल्याची माहिती मिळताच जनता दल कार्यकर्ते चाैकात एकत्र अाले. त्यांनी फटाक्यांची अातषबाजी केली. येथूनच निहाल अहमद यांचा फाेटाे घेऊन मिरवणूक काढण्यात अाली. ज्या ठिकाणी सामूहिक साखळी बाॅम्बस्फाेट झाले हाेते. त्या मुशावरत चाैकापर्यंत ही मिरवणूक नेली.

एका संशयिताचा गतवर्षी मृत्यू
घटनेतील संशयित अाराेपी शब्बीर अहमद मसीउल्ला याचा गतवर्षी घराच्या भिंतीखाली दबून मृत्यू झाला. नूरबाग भागात राहणाऱ्या शब्बीरच्या राहत्या घराची भिंती काेसळल्याने ताे गंभीर जखमी हाेऊन मृत झाला हाेता. यात त्याचा अकरा वर्षांचा मुलगा महरा अक्रमही गंभीर जखमी झाला हाेता. या घटनेची अायेशानगर पाेलिस ठाण्यात नाेंद झाली अाहे.

‘निष्पाप युवकांना सरकारने द्यावी ५० लाखांची भरपाई’
‘मालेगावात झालेल्या बाॅम्बस्फाेट प्रकरणात स्थानिक नऊ निष्पाप युवकांना अडकवून त्यांना तुरुंगात सडवणाऱ्या दहशतवादविराेधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांना शिक्षा करावी तसेच या युवकांना नुकसान भरपाई म्हणून सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपये द्यावेत,’ अशी मागणी मालेगावातील काॅंग्रेसचे अामदार अासिफ शेख यांनी केली अाहे.

काेर्टाचा निर्णय येताच डोळ्यात तरळले अानंदाश्रू
मुंबई- विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी नऊ जणांची निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय सुनावताच न्यायालयात हजर असलेल्या आरोपींचे चेहरे आनंदाने उजळले. एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असलेल्या या आरोपींना आनंदाच्या भरात अश्रू आवरणे त्यांना कठीण झाले होते. न्यायालयात उपस्थित असलेल्या त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली.