आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावे मोठी, गट छोटा; बंडाळीची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - सन 1992 नंतर प्रथमच इतर मागासवर्गीयांसाठी रावळगाव गट राखीव झाला आहे. परिणामी गटात उमेदवारी करणा-यांची स्पर्धा अधिक झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची वाढती संख्या असल्याने योग्य उमेदवार देण्याबरोबरच पक्ष संघटन राखतानाही नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार व पक्ष नेतृत्वाचाही कस लागणार आहे. बंडखोरी टळली तर काट्याची लढत पाहायला मिळणार आहे.
सन 1992ला सर्वसाधारण खुला असलेला रावळगाव गट नंतरच्या तीन पंचवार्षिक निवडणुका अनुसूचित जाती, जमातींसाठी राखीव झाला. त्यामुळे स्थानिक खुल्या गटातील कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधीही मिळाली नाही. यानंतर प्रथमच आगामी निवडणुकीसाठी गट इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाला आहे. तालुक्यातील कमी गावांचा हा छोटा गट असला तरी लोकसंख्येच्या दृष्टीने गावे मोठी आहेत. इतर मागासवर्गीय गटातून उमेदवारी करू शकणारे जवळपास सर्वच उमेदवार खुल्या गटातही सामना करू शकतात, हा सर्वमान्य अंदाज आहे. त्यामुळे दीर्घ काळानंतर येथे मातब्बर उमेदवारांची लढत पाहायला मिळणार आहे. जि.प.च्या इतिहासातील सर्वाधिक काळ कॉँग्रेसचा प्रभाव असलेल्या या गटावर 2002 नंतर शिवसेनेचा शिरकाव झाला. उमेदवार निवडून देण्याइतपत सेनेचे संघटन येथे वाढले. तरीदेखील इतर पक्षांची क्षमता कमी झालेली नव्हती. परिणामी सेनेच्या बरोबरीनेच इतर पक्षांचेही प्राबल्य या गटात आहे. त्यामुळे उमेदवार देताना पक्षांनाच कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी टाळत उमेदवार देण्यात जे पक्ष यशस्वी होतील, त्यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. सन 2007 च्या निवडणुकीत या गटातून शिवसेनेचे दीपक चव्हाण विजयी झाले होते. त्यांना सात हजार 239 मते पडली होती, तर कॉँग्रेसचे विश्वास चव्हाण यांना पाच हजार 718 ही दुस-या क्रमांकाची मते पडून त्यांचा पराभव झाला होता.
गटाचा इतिहास - रावळगाव गटातून 1978 मध्ये निवडून गेलेले टी. झेड. पवार यांनी तब्बल बारा वर्षे जि.प.चे अध्यक्षपद भूषविले. जिल्ह्यात दीर्घ काळ नेतृत्वाची संधी मिळालेला हा एकमेव गट असावा. यापाठोपाठ 1997 ला अलका आखाडे या गटातून निवडून गेल्या. त्यांना जि.प.च्या समाजकल्याण सभापतिपदाची संधी मिळाली. या वेळी त्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे सेनेकडून निवडून गेल्या होत्या. जगप्रसिद्ध असलेल्या रावळगाव चॉकलेट व ट्रॉफींचा रावळगाव कारखाना याच गटात आहे.
पोटनिवडणुकीतील सत्तांतर - रावळगाव गटात 2007 ला शिवसेनेकडून दीपक चव्हाण निवडून गेले होते. परंतु, जात प्रमाणपत्र (हिंदू ठाकूर) पडताळणीत ते अपात्र ठरले. तरीदेखील अडीच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी साधला होता. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार व अद्वय हिरे समर्थक मांगुलाल सोनवणे हे विजयी झाले. त्यांनी सेनेचे उमेदवार विठ्ठल सोनवणे यांना पराभूत केले होते. विशेष म्हणजे विठ्ठल सोनवणे हे दीपक चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार होते. या वेळी त्यांना तिस-या क्रमांकाची मते पडून ते पराभूत झाले होते.