आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारीपूर्वीच वातावरण तापवण्याचा प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - झोडगे व निमगाव गट आरक्षित झाल्याने खुल्या गटातील इच्छुकांची अडचण झाली असून, उमेदवारी पुनर्वसनासाठी या सर्वांनीच सर्वसाधारण खुला झालेल्या कळवाडी गटावर डोळा ठेवला आहे. विशेष म्हणजे स्थानिकांपेक्षा गटाबाहेरील कार्यकर्त्यांचाच उमेदवारीसाठी अधिक आटापिटा सुरू आहे. परिणामी उमेदवारी मिळण्याआधीच अनेकांनी गटात वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
माळमाथ्यावरील 25 गावांचा परिसर कळवाडी गटात येतो. धुरंधर, आक्रमक व अभ्यासू नेतृत्वाअभावी हा गट विकासाच्या दृष्टीने सातत्याने दुर्लक्षित राहिला आहे. निवडणुकीत विजयी होणा-यांचे पाच वर्षे पुनर्वसन व एखाद्या पक्षाचे संख्याबळ वाढवणे, एवढीच काय ती भूमिका गटातून निवडून जाणा-या अनेक सदस्यांनी वठवली. त्यामुळे स्थानिक जनता कष्टाळू असली तरी चेहराहीन नेतृत्वाचा फटका गटाला सातत्याने बसत गेला. गेल्या दहा वर्षांत मिळालेले दुबळे नेतृत्व अधिक नजरेत भरणारे ठरले. सन 2007 च्या निवडणुकीत या गटात शिवसेनेच्या गीताबाई गांगुर्डे विजयी झाल्या होत्या. त्यांना आठ हजार 403 मते मिळाली होती, तर सोनचळाबाई सोनवणे या कॉँग्रेसच्या उमेदवाराला सात हजार 36 मते मिळून त्या पराभूत झाल्या होत्या. आगामी निवडणुकीसाठी हा गट सर्वसाधारण उमेदवारांकरिता खुला झाला आहे. नजीकचे झोडगे व निमगाव हे दोन्ही गट महिला अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाल्यामुळे या गटांमधून निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणा-या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. परिणामी कळवाडी गट पुनर्वसनासाठी त्यांना सोयीचा वाटू लागला आहे. पक्ष नेतृत्व कशा पद्धतीचे उमेदवार देतात, त्यावर येथील सामना लक्षवेधी ठरणार आहे. गटाबाहेरील रहिवासी उमेदवार दिले गेलेच तर पैसा फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चाल करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मिळण्यापूर्वीच अनेकांनी गटांमधल्या वा-या करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुळात जनराज्य आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातच खरा सामना दिसत असला तरी या तिरंगी लढतीत अंतर्गत दोन पक्षात गोपनीय तडजोडी झाल्या तर सामना दुरंगी होऊन जनतेवर लादलेला एखादा उमेदवार पाडण्याचे राजकारणदेखील साधले जाण्याची शक्यता आहे.
कळवाडी गट सर्वसाधारण खुला झाल्याने गटाबाहेरील इच्छुकांनी गटात उमेदवारीसाठी पक्षनेत्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनराज्य आघाडी व शिवसेना असा तिरंगी सामना बघायला मिळणार असून, अंतर्गत तडजोडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.