मालेगाव- मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज (बुधवारी) अत्यंत चुरशीची झाली. तिसर्या 'महाज'चे नगरसेवक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासीन यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी शहर विकास आघाडीचे अर्थात एमआयएमचे युनूस इसा यांचा विजय झाला.
मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासी यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बुलंद एकबाल यांचा तर युनूस इसा यांनी कॉंग्रेस आघाडीचे सुनील गायकवाड यांचा पराभव केला. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तिसर्या आघाडीच्या बाजूने मतदान केले. मात्र, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युनूस इसा यांचा विजय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, राज्यभर विस्तारत असलेल्या हैदराबाद स्थित ‘एमआयएम’ पक्षाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिवसेनेच्या नेत्यांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांवर विखारी टीका केली होती. मात्र, सत्तेसाठी तत्त्व, विचारधारा बाजूला ठेवून कोण कुणाशी हात मिळवणी करील याचा नेम नसतो. मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस- जनता दल आघाडी आणि ‘महाज’ व मित्रपक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार हे निश्चित होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएम समर्थक नगरसेवकांनी ‘महाज’च्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून शिवसेना नगरसेवकही ‘महाज’च्याच पाठिंबा देणार असल्याचे आधीच स्पष्ठ झाले होते.
‘महाज’चा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना व एमआयएम नगरसेवकांनीच अप्रत्यक्ष हातमिळवणी केल्याचे अनोखे चित्र दिसून यावेळी दिसून आले आहे.