आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malegaon Municipal Corporation Area Extension Reserve

मालेगावात वाढीव मनपा हद्दीत होणार फेरसर्वेक्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: महापालिका हद्दवाढीत समाविष्ट सहा गावे व कलेक्टरपट्टा वसाहतीत येत्या महिनाभरात घरपट्टी व पाणीपट्टी आकारणीसाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात बेकायदा नळ जोडण्या कायम करण्यात येऊन त्यांनाही नळपट्टी लावण्यात येणार आहे.
सोयगाव, द्याने, कलेक्टरपट्टा, म्हाळदे, सायने बुद्रुक, भायगाव, दरेगाव या गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे दप्तर महापालिका आयुक्त कार्यालयात जमा केले आहेत. त्या दिवसापासून या भागांमध्ये महापालिकेचा प्रशासकीय अंमल सुरू झाला आहे. त्यानुसार प्रशासनातील महत्त्वपूर्ण असलेल्या कर वसुली विभागाच्या नियोजनाच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. शासनाने वाढीव हद्दीत जकात नाके उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नियोजित ठिकाणांवर नाके उभारल्यानंतर पहिल्या टप्प्यात घरपट्टी व पाणीपट्टी आकारणीसाठी महापालिकेकडून लवकरच नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यांना सध्या घरपट्टी आकारली जाते, ती आहे तेवढीच घेतली जाणार आहे. परंतु, ज्या घरांना घरपट्टी लागू नाही, त्यांना महापालिका नियमानुसार नवीन घरपट्टी आकारणी करण्यात येणार आहे.
पाणीपट्टी मात्र मनपा दरानेच घेतली जाणार असून, बेकायदेशीर नळ जोडण्या कायदेशीर करून त्यांना नव्याने पाणीपट्टी लावली जाणार आहे. ज्या परिसराला महापालिका पाणी पुरविते, त्या ठिकाणी पाणीपट्टीसाठी सर्वप्रथम सर्वेक्षण व आकारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. परंतु, ज्या गावांना स्थानिक पाणीपुरवठा अथवा सामूहिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरविले जाते, त्या संबंधित संस्थांनी महापालिकेकडे या योजना वर्ग केल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठय़ाचे नियोजन, पाणीपट्टी आकारणी व वसुलीचे नियोजन केले जाणार आहे. परंतु, संबंधित योजना सदर संस्थाच चालवत असतील तर पाणीपुरवठय़ाची जबाबदारी या संस्थांचीच राहील.