आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावात जकात विरोधात व्यापार्‍यांचा हल्लाबोल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव: शहर व हद्दवाढीतील गावांच्या सीमांवरिल जकातीचा घोळ निकाली काढावा यासह अनेक मागण्यासाठी सोयगाव व्यापारी असोसिएनने शनिवारी बंद पाळला. कार्यकर्त्यांनी सोयगाव नाक्याची मोडतोड करून जकात वसुली बंद पाडली. याचप्रमाणे वडगाव व नामपूर जकात नाक्यावरही निदर्शने केली.
महापालिकेत समाविष्ठ सोयगाव, म्हाळदे, द्याने, सायने बुद्रुक, भायगाव, दरेगाव या गावांच्या सीमेवर जकात नाके कार्यान्वित करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने गेल्या 19 तारखेला जकात नाके उभारण्यास परवानगी दिली. सदरचे पत्र शुक्रवारी सायंकाळी महापालिकेला प्राप्त झाले. या पार्श्वभुमीवर महापालिकेने सदर गावांच्या सीमेवर रात्री 12 वाजेपासून जकात नाके कार्यान्वित केली आहेत. याची माहीती व्यापार्‍यांना मिळताच सोयगाव किराणा व्यापारी असोसिएशन, सोयगाव बिल्डींग मटेरीयल व्यापारी असोसिएन यांनी उत्स्फुर्त बंद पाळला. यानंतर सर्व व्यापारी येथील अँरोमा चित्रपट गृहाजवळ एकत्र जमले. नीलेश आहेर, मनोहर बच्छाव यांनी व्यापारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर याच ठिकाणाहून सोयगाव जकात नाक्यापर्येंत मुक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, काही अज्ञात कार्यकर्त्यांनी जकात नाक्याच्या टपरीची मोडतोड करून जकात वसुली बंद पाडली होती. त्यामुळे मोर्चाचे येथील सभेत रुपांतर झाले. याची माहीती आमदार दादा भुसे यांना मिळताच ते आंदोलन स्थळी पोहचले. त्यांनी हद्दवाढीतील गावांना सुविधा व विकास कामांसाठी शासनाने पॅकेज द्यावे या नंतरच जकात वसुली सुरू करावी अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. परंतु प्रत्यक्ष अनुदान मंजुर करण्याआधीच जकात नाक्यांना दिलेली परवानगी म्हणजे व्यापार्‍यांची क्रुर चेष्टाच असल्याचा आरोप भुसे यांनी केला. आंदोलनात किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतिष सुराणा, नितिन बम्हेचा, राजू गगराणी, सुभाष ब्राम्हणकर, रविंद्र निकमआदी सहभागी झाले होते.