आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराकडे दुर्लक्षाचा आरोप; सिव्हिल लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वडील व भावापाठोपाठ जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात उपचार घेणा-या नाजिया सय्यद (वय ७) या मुलीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड केली. संतप्त नातेवाइकांनी शल्यचिकित्सकांना घेराव घालत दोषींवर कडक कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
पिंजार घाट परिसरात गेल्या शुक्रवारी (दि. २८) रात्री निजाम हुसेन सय्यद (वय ३५), रजा निजाम सय्यद (वय ३) व नाजिया निजाम सय्यद यांच्या अंगावर इलेक्ट्रिक गिझर फुटल्याने उकळलेले पाणी अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले होते. रजाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारी निजाम यांचाही मृत्यू झाला. निजाम केवळ ३० टक्के भाजले असताना योग्य उपचार न िमळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आक्षेप त्यांच्या आप्तांनी घेतला होता. मुलगी नाजियाचाही गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका कुटुंबातील तिघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. नातेवाइकांसह त्यांनी जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. कर्मचारी व पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवण्याचा प्रयत्न केला असता रेटारेटीत काच फुटली. काहींनी दगडफेकही केली. सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांची समजूत काढली. मात्र, एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांना त्यांनी जाब विचारला. उपचारात हलगर्जीपणा झाला असेल, तर संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
जनसंपर्काचा अभाव
रुग्णालयात रुग्ण, नातेवाइकांना अडचण आल्यास, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस चौकीत आणि माहिती देण्यासाठी रुग्णालयात कोणी उपलब्ध नसल्याने जनसंपर्क विभागास अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.
सहा दिवसांत तीन मृत्यू
शुक्रवारी भाजल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन-दोन दिवसांच्या अंतराने, सहा दिवसांत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हलगर्जीपणाचा आरोप
गंभीर भाजलेले रुग्णही अनेकदा वाचतात. मात्र, हे तिघे कमी प्रमाणात भाजलेले असूनही त्यांचा मृत्यू झाल्याने उपचारांत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.