आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mangala Express Accident : Central Railway Transport Come On Its Early Position

मंगला एक्स्प्रेस दुर्घटना : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मंगला एक्स्प्रेसला शुक्रवारी घोटीजवळ झालेल्या अपघातामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी पूर्ववत झाली. अपघात स्थळावर दुरुस्तीचे काम वेगाने करण्यात आल्याने जिथे काही आठवड्यांचा कालावधी लागणे शक्य होते, तेथे अवघ्या तीस तासांत रेल्वेसेवा पूर्ववत झाली. सुरुवातीला संथगतीने वाहतूक सुरू असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या, तर सकाळच्या वेळेतील स्थानिक पंचवटी, गोदावरी, भुसावळ-पुणे व राजाराणी एक्स्प्रेस सलग दुस-या दिवशी नादुरुस्त ट्रॅकमुळे धावल्या नाहीत.
घोटीजवळ शुक्रवारी सकाळी 6.15 वाजता मंगला एक्स्प्रेस रुळावरून घसरून अपघात होऊन पाच ठार, तर 35 प्रवासी जखमी झाले होते. तुटलेला ट्रॅक इगतपुरी, घोटी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मुंबईच्या कर्मचारी, अधिका-यांनी दिवस-रात्र मेहनत करून दुरुस्त करण्यात येऊन शनिवारी सकाळी 8.50 वाजता ट्रॅकची तपासणी करून सकाळी 10.30 वाजता अप-डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली. या मार्गावरून गाडीचा वेग किमान ताशी शंभर ते सव्वाशे किलोमीटर असतो. ट्रॅकच्या दुरुस्तीमुळे अपघाताच्या ठिकाणावरून गाड्या कमीत कमी दहा ते वीस ताशी वेगाने सोडण्यात येत होत्या. वाहतूक सुरळीत झाली असली, तरी नियोजित वेळेऐवजी उशिराने गाड्या सुटल्या. त्यामुळे उशिराने व कमी वेगामुळे दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान, घोटी येथून तीन प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
तपोवनने वाहतुकीचा प्रारंभ
वाहतुकीचा प्रारंभ तपोवन एक्स्प्रेसने झाला. मुंबईकडून नाशिककडे तपोवन एक्स्प्रेसला सर्वप्रथम हिरवा कंदील दाखवण्यात आला. मार्गावर अडवलेल्या चार गाड्या नाशिक रोडकडून मुंबईकडे सोडण्यात आल्या. अपघात झालेली मंगला एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिराने मुंबईकडे रवाना झाली. तत्पूर्वी कोलकाता मेल, राजेंद्रनगर, जनता एक्स्प्रेस, भुवनेश्वर एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस मुंबईवरून सोडण्यात आल्या. नाशिककडून हटिया एक्स्प्रेस, जबलपूर गरीब रथ, सेवाग्राम एक्स्प्रेस, पटना सुपरफास्ट, पुष्पक एक्स्प्रेस धावल्या.
हेल्पलाइनवरून पाच हजार जणांशी संवाद
जखमी, रेल्वेगाड्यांची माहिती देण्यासाठी रेल्वेच्या वतीने मुंबई, इगतपुरी, दिल्लीसह नाशिक रोड स्थानकावर हेल्पलाइन सेवा कार्यान्वित केली होती. नाशिक रोडला मुख्य तिकीट तपासणीस आशिष जोशी यांची नेमणूक केली होती. शुक्रवार व शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत फोनवर दोन हजार, तर प्रत्यक्ष केंद्रावर आलेल्या साडेतीन हजार प्रवाशांना गाड्यांबाबत त्यांनी माहिती दिली. ट्रॅक नादुरुस्तीमुळे इतर मार्गांवरून वळवण्यात आलेल्या गाड्यांचा मार्ग पूर्ववत करून सोडण्यात त्या आल्या.
जखमींना मोफत सेवा
अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह, उपचारांनंतर रुग्णालयातून सोडलेल्या जखमींना रेल्वेमार्फत घरापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. उपचार घेणा-यांना पोहोचवण्याची पास देऊन व्यवस्था करण्यात आली आहे. आगाऊ आरक्षण, तिकीट काढणा-या प्रवाशांना दुस-या गाड्यांमध्ये प्रवासाची सोय करून देण्यात आली असून, तिकीट रद्द करणा-यांना पैसे परत केले आहेत. एम. बी. सक्सेना, अधीक्षक, नाशिक रोड,