आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Ernakulam Mangala Lakshadweep Express Accident Near Nashik

इगतपुरीजवळ रेल्वे अपघातात पाच ठार, 35 प्रवासी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - इगतपुरीनजीक घोटीजवळ मंगला एक्स्प्रेसचे (निजामुद्दीन-एर्नाकुलम) दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी ठार तर 35 जखमी झाले. जखमींमध्ये पाच मुले व महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी सव्वासहाला झालेल्या या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.
निजामुद्दीनहून पनवेलमार्गे एर्नाकुलमला जाणा-या या एक्स्प्रेसला घोटी स्थानकापासून दोन किलोमीटरवरील प्रचितराम मंदिराजवळ अपघात झाला. यात राजू कुशवाह (मथुरा) सत्याबीरसिंग, राहुल शुक्ला, पवनेश कुमार व राम प्रवेश (बिहार) हे प्रवासी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.
इगतपुरी थांबा असल्याने नाशिक येथून पहाटे 5.30 वाजता रवाना झालेली मंगला एक्स्प्रेस घोटी स्थानकावर 6 वाजून 13 मिनिटांनी पोहोचल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत दहा डबे रुळावरून घसरले. तीन डबे एकमेकांवर आदळले. स्लीपर कोचच्या एका डब्याची दिशा बदलली. पेन्ट्रीकार अपवरून डाऊन लाइनवर गेली. यासह टू व थ्री टायरचे दहा डबे घसरले. इंजिनची पुढील दोन चाके रुळावरून उतरली होती तरी त्याला जोडून असलेले दोन व शेवटचे चार डबे सुरक्षित राहिल्याने त्यातील प्रवासी बचावले. जोरदार आवाज, प्रवासी बर्थवरून खाली कोसळले
डबे घसरताच जोराचा आवाज झाला. गाडी जागीच थांबली. डबे आदळल्याने प्रवासी बर्थवरून खाली पडले. त्यामुळे आरडाओरड आणि आक्रोश सुरू झाला. राम नरेश हा प्रवासी दोन डब्यांत दबला जाऊन जागीच ठार झाला. तो बिहारमधील महादेव गावचा रहिवासी आहे. अपघातानंतर आठ तास झाल्यावरही मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. शासकीय यंत्रणेची वाट न पाहता घोटीच्या गावक-यांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रुग्णालय, घोटीतील वक्रतुंड हॉस्पिटल व नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवले. रेल्वेने अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना मंगला एक्स्प्रेसमध्ये व्यवस्था केली. परिवहन महामंडळ तसेच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीनेही बसेसची व्यवस्था केली होती.
जवान सुदैवाने बचावले : जम्मू येथे तैनात लष्कराच्या 116 टीए बटालियन नाशिकचे सात जवान सुदैवाने बचावले. अपघातापूर्वी तासभर भुसावळ, मनमाड व नाशिकचे हे पाच जवान नाशिकला उतरले. काही वेळातच अपघाताची बातमी त्यांना समजली.
उशिरापर्यंत वाहतूक सुरळित: विभागीय महसूल आयुक्त रविंद्र जाधव यांनी पहाणी करून जखमींची विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. स्थानक नागरिक, डॉक्टरांनी वेळीच मदत केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता यांनी अपघाताची माहिती घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या.आमदार निर्मला गावित यांनी जखमींची विचारपूस करून अपघाताची माहिती घेतली. घटनेनंतर गाडीचे गार्ड प्रविण सकळकर प्रशासन,मदत कार्य घटनास्थळी उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले.
अनर्थ टळला: विलास भगत यांच्या घरापासून अवघ्या तीस ते चाळीस फुटावर अपघात घडला. मात्र घराला कुठलीही हानी पोहचली नाही.अशा गंभीर परिस्थितीत भगत कुटूंबियांनी जखमी महिला प्रवाशांना मदत करुन धीर देण्याचे काम केले.
तुटलेल्या ट्रॅकची लॅबमध्ये तपासणी : अपघातास कारणीभुत असलेल्या रेल्वे ट्रॅकचे तुकडे लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तपासणी अहवालानंतर ट्रॅक तुटण्याचे व अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.
डॉक्टर देवदुत : घोटी येथील शासकीय,खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल करताच वैद्यकिय अधिक्षक डॉ.श्रीव्यास,डॉ,घोलप, डॉ.चव्हाण,डॉ.बांगर,डॉ.कंदेवाड,डॉ.कोरडे,डॉ.संजीव मोरे यांनी तात्काळ उपचार केल्याने अनेकांचे प्राण वाचले. अपघात झाल्याचे समजताच संपुर्ण गाव घटनास्थळी पोहचले. प्रत्येकाने शक्य
ती मदत केली.
अपघातातील जखमी
संगीबा (वय 59), शकुंतला (62), राम आर (38), निशा (33), एम कुमार (42), कृष्णलाल (39), बिनोदकुमार (32), पुष्पा सिंग (44), तोबाराम, राजू प्रमावोबी (64), रिंकू (54), कमला रमनानी (70), माधुरी महिरानी (28), सी मुरलीकुमार (60), सिमरन रामनानी (10), अशोक कुरगावकर (50), राहुल प्रकाश रामनानी (10), टेक सिंग (60), सूरज मुखी गौतम (50), सूरज कुमार (38), उत्तमचंद खंडेलवाल (40), रिंकू शर्मा (25), सुनीता राठोड (28), शिबू राठोड (वय वर्षे दीड), राजेश कुमार (25), पुरुषोत्तम मोतीराम भैरवी (54), कुमार रामवानी (44), निशा रामनामनी (25), रिया रामनामनी (5), पूजा रामनामनी (13), राम रामनामनी (36), प्रकाश रामनामनी, स्नेहा रामनामनी (17), नितीन पिसे.
ठिकठिकाणचे पोलिस घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच अधिक्षक विक्रम देशमाने,राजेंद्र सिंह,निरिक्षक भास्कर जाधव घटनास्थळी दाखल झाले.परिस्थिती लक्षात घेऊ नाशिक ग्रामीण,त्र्यंबकेश्वर,सिन्नर,घोटी, इगतपुरी, वाडीव-हे येथील पोलिस पथकाने घटनास्थळी मदत कार्यात सहभाग घेतला.
उपचारामुळे जीवदान
केटरिंगच्या कामासाठी मुंबईला जात असताना झालेल्या अपघातात बेशुद्ध पडल्याने मृत म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, जागरुक सहकारी प्रवाशांनी रुग्णालयात दाखल केल्याने मला जीवदान मिळाले. -रिंकू शर्मा, जखमी प्रवासी, उत्तर प्रदेश
वडापावचे मोफत वाटप
इगतपुरी येथील राजू वडापाव सेंटरच्या वतीने मंगला एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी, पोलिस, डॉक्टर, कर्मचारी तसेच जखमींना पाहण्यासाठी आलेल्या असंख्य लोकांना वडापाव, चहा, कॉफी, बिसलरीचे पाणी व बिस्किटांचे मोफत वाटप राजू,
सादिक खान, अलिम खान, इम्रान खान, जाफर खान, इप्तिहाज यांनी केले.
परमेश्वराची कृपा
हरिकिशन हॉस्पीटल व रिसर्च सेंटरच्या 16 विद्यार्थीनी व शिक्षक असे 17 जण दिल्ली येथील प्रशिक्षण पुर्ण करुन मुंबईला परततांना सकाळी अचानक जोरदार आवाज झाला आणि आरडाओरड सुरु झाली.आम्ही भयभीत झालो व एकमेकींना घट्ट मिठी मारली.काही वेळानंतर डोळे उघडून बाहेर बघितले तर भयानक चित्र दिसले.मात्र परमेश्वराच्या आशिर्वादाने सर्वजणी सुखरुप होतो.
अरुणा वंजारे प्रवाशी, हरिकिशन हॉस्पीटल
अनेक प्रश्न...
हा अपघात म्हणजे घातपात, अपघात की हलगर्जीपणा असे प्रश्न उपस्थित होत आहेत. रोज तपासणी केली असेल तर ट्रॅक तुटला कसा? अपघात घडला तेथील रुळ बदलण्याची सूचना होती. मात्र, ते बदललेच नाहीत. केवळ हलगर्जीपणामुळे पाच प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचे दिसत आहे.
ट्रॅक तुटल्याने गाडी घसरली?
ट्रॅकचे जवळपास सात ठिकाणी झालेले तुकडे हेच अपघाताचे प्रमुख कारण मानले जात आहे. मार्गाची नियमित तपासणी, पाहणी होत असताना ट्रॅकचे तुकडे कसे झाले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आज सायंकाळपर्यंत दोन्ही मार्ग सुरळीत
अपघातामुळे नादुरुस्त झालेल्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून शनिवारी सकाळी 9 पर्यंत एक ट्रॅक, तर सायंकाळपर्यंत दुसरा ट्रॅक दुरुस्त होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावर रेल्वेची वाहतूक सायंकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.


हेल्पलाईन नंबर पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा..