आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळांच्या राजाने भरला नाशिककरांच्या आनंदात गोडवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय मुहूर्त असलेला अक्षयतृतीया सण नाशिकमध्ये शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. फळांचा राजा हापूस आंब्याची खरेदी करीत नाशिककरांनी अक्षयतृतीयेच्या आनंदात गोडवा भरला.
अक्षयतृतीयेनिमित्त केलेली पूजा व दान हे अक्षय राहते. अविनाशी दान हे अक्षय दान असल्याने हिंदू धर्मामध्ये अक्षयतृतीयेला विशेष महत्त्व आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करून शहरात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे पितरांना नैवेद्य देण्यात आला. गोदावरीत भाविकांनी स्नान केले.
नववर्षातील पहिला सण
चैत्र शुक्ल प्रतिपदेस नववर्षारंभ झाल्यानंतर पहिला सण येतो, तो अक्षयतृतीयेचा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अनेकांकडून या दिवशी नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो. शुभ दिन म्हणून बाजारात दागिन्यांसह विविध नवीन वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने मार्च एण्डनंतर खर्‍या अर्थाने बाजारपेठेला झळाळी मिळाली.
विविध वाणांना मागणी
अक्षयतृतीयेच्या आनंदात गोडवा भरला तो फळांचा राजा हापूस आंबा खरेदीने. अक्षयतृतीयेनिमित्त चोखंदळ खवय्यांनी आंबा खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. गत आठवड्यापासून बाजारात रत्नागिरीचा हापूस आंब्यासह वेगवेगळ्या वाणांचे आंबे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भरवलेल्या आंबा महोत्सवातही दिवसभर आंबा खरेदीची लगबग पाहावयास मिळाली.
रत्नागिरी हापूस : 300 ते 350 रुपये - 500 रुपये (प्रतिडझन)
देवगड हापूस : 400 रुपये - 500 ते 600 रुपये (प्रतिडझन)
केशर : 80 रुपये - 100 रुपये (प्रतिकिलो)
लालबाग : 40 रुपये - 50 ते 60 रुपये (प्रतिकिलो)
बदाम : 40 ते 50 रुपये - 60 ते 70 रुपये (प्रतिकिलो)