आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Kokate News In Marathi, Chhagan Bhujbal, Congress, Modi, Divya Marathi

डॅमेज कंट्रोल करताना आघाडीच्या नेत्यांसह कोकाटेंच्याही नाकीनऊ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - महाराष्ट्रात माझी इभ्रत वाचवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेस आघाडीचा धर्म पाळा आणि छगन भुजबळ यांना विजयी करण्याची निर्वाणीची आर्जवे करून आमदार माणिकराव कोकाटे यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या कोकाटे सर्मथकांच्या मेळाव्याची अखेर शांततेत झाली, तरी आरंभी मोदी सर्मथनाच्या घोषणा देत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतरांच्या भाषणात व्यत्यय आणत सभेत झालेल्या गोंधळाने सर्वच नेत्यांना ‘डॅमेज कंट्रोल’ करताना नाकीनऊ आले.


लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारात कोकाटे व तालुका कॉँग्रेस कमिटी सक्रिय नसल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. मात्र, याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून मेळाव्यात निर्णय जाहीर करण्याचे ठरवल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी बाजार समितीच्या आवारात मेळावा सुरू झाला. प्रा. खालकर यांनी प्रास्ताविकात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व छगन भुजबळ सभास्थानी येत असल्याचे जाहीर करताच सर्व कार्यकर्ते उठून उभे राहिले. ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देत सुरू झालेला कार्यकर्त्यांचा गोंधळ कोकाटेंनी महत्प्रयासाने शांत केला. आपण कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले आहे. गोंधळ घालणे यात बसणारे नाही. ज्यांना आमचे विचार पटणार नाहीत, त्यांनी सभा सोडून चालते व्हावे, तुमच्यासाठी मी भक्कमपणे उभा आहे. मुख्यमंत्र्यांनी विकासनिधी देताना कधी माझा शब्द डावलला नाही. तेथे असलेली माझी इभ्रत वाचवायची असेल तर भुजबळांनाच मते द्यावी लागतील, असे कोकाटेंनी बजावले व सभा संपल्याचे जाहीर केले. मात्र, या ताणतणावात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महसूलमंत्री थोरातांचे भाषण राहिल्याचे नंतर त्यांच्या लक्षात येताच पुन्हा त्यांनी लोकांना शांत केले.

थोरातांचे भाषण अन् मोदींचा गजर
थोरातांनी सोनिया व राहुल गांधींचे नाव घेऊन पॉझ घेत उपस्थितांना आता कोणाचे सरकार येणार असा सवाल करताच. ‘मोदी सरकार’ असे म्हणत उपस्थितांनी हात उंचावून गोंधळास सुरुवात केली. यानंतर कोकाटेंनी कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेत खाली बसवल्यानंतर थोरातांनी कोकाटेंच्या कामाचे कौतुक करताना त्यांना मंत्री करायचे असेल तर कॉँग्रेस आघाडी विजयी झाली पाहिजे, असे म्हणत आपले भाषण पूर्ण केले.

विनायक दादा पाटील यांनी केलेल्या भाषणात ‘तुमच्या कानात सांगतो, कुणाला सांगू नका’ असे म्हणत कोकाटेंना मंत्री करण्याचे ठरले आहे. त्याचा सूचक मी, अनुमोदक बाळासाहेब थोरात आहेत. सिन्नरला लाल दिवा मिळण्यासाठी भुजबळांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तुकाराम दिघोळे यांचे भाषण झाल्यानंतर पुन्हा कोकाटेंनी माईक हातात घेतला. छगन भुजबळांचे आमचे गैरसमज आता दूर झाले आहेत. अर्थसंकल्पातला 30 टक्केनिधी नाशिक जिल्ह्यासाठी आणण्याची धमक फक्त भुजबळ यांच्याकडेच आहे, हे सर्वांना मान्य करावे लागेल. त्यांनाच मते द्यावी लागतील. कोणत्याही प्रकारचा जातीभेद तसेच सोनिया, राहुल व भुजबळांविषयीचे अपशब्द आपण सहन करणार नाही. नारायण राणे यांच्याकडूनही तसाच संदेश आला आहे. माझी इज्जत राखण्यासाठी भुजबळांना विजयी करायचे आहे, असे कडक शब्दांत सुनावत कोणाच्या काही शंका असतील तर त्या दूर करण्यास आपण सदैव तयार आहोत, असे सांगून कोकाटेंनी मेळाव्याची सांगता केली.


अखेर असा झाला समझोता
भुजबळांशी काय समझोता झाला, असा प्रश्न कोकाटेंना केला असता ते म्हणाले, आघाडीचा धर्म राष्ट्रवादीकडूनही पाळण्याचे आश्वासन देत स्थानिक राजकारणात ढवळाढवळ न करण्याचे भुजबळांनी मान्य केले. भुजबळांकडून त्रास झाला नाही. मात्र, त्यांच्या चिल्यापिल्यांकडून जो त्रास झाला त्यांना बळ न देण्याचे आश्वासन भुजबळांनी दिल्याने आमच्यात समझोता झाल्याचे कोकाटे म्हणाले.