आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Kokate News In Marathi, MLA, Lok Sabha Election, Divya Marathi

पाठिंब्याबाबत आमदार माणिकराव कोकाटे उद्या मांडणार भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल, मंगळवारच्या मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट करणार असून, या वेळी संबंधित उमेदवारास पाचारण केले जाईल, असा खळबळजनक पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेतला. छगन भुजबळ यांनी यापूर्वी स्थानिक राजकारणात ढवळाढवळ केल्याने आघाडीचा धर्म केवळ आपणच पाळायचा का? अशी नाराज कार्यकर्त्यांची भूमिका असून, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.


भुजबळ यांच्याकडून भविष्यात स्थानिक राजकारणात ढवळाढवळ होणार नाही, यासंबंधी ठोस आश्वासन मिळाले तरच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे कोकाटे म्हणाले. भुजबळांच्या प्रचारात कार्यकर्त्यांसह सक्रिय होण्यासाठी वनाधिपती विनायकदादा पाटील प्रयत्नशील आहेत. पाठिंब्याचा निर्णय घेण्यासाठी होणार्‍या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विनायकदादा पाटील व माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते तुकाराम दिघोळे यांना पाचारण केल्याचे सूतोवाच कोकाटे यांनी केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांना सिन्नरमधून मताधिक्य मिळवून दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. मात्र, या विजयाचे श्रेय कोकाटेंनी लाटू नये, अशा प्रकारचे विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी केले होते. भुजबळांनी याबाबत खुलासा करण्याचे आवाहन करूनही त्यांनी मौन पाळले. त्यानंतर स्थानिक निवडणुकीत भुजबळ यांनी नेहमी विरोधकांनाच बळ देण्याचे काम केले. त्यांनी आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणला. आमची गरज असताना विरोधी व्यासपीठावर बसणे पसंत केले. तालुक्यातील कॉँग्रेसच्या अस्तित्वाला त्यांनी सतत आव्हान देण्याचाच प्रयत्न केला. आपण शेतकरी हितासाठी मंजूर करून आणलेल्या 12 सहकारी सोसायट्यांची मान्यता रद्द व्हावी, यासाठी आमदार जयंत जाधव यांनी प्रयत्न केले. त्यामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी भुजबळांचीच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कणकवलीत जशी कणखर भूमिका घेतली, तशीच भूमिका सिन्नरमध्ये घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही कोकाटे यांनी या वेळी व्यक्त केली. सध्या हेमंत गोडसे यांचा प्रचार करणारे पंचायत समितीचे सभापती बाळासाहेव वाघ यांच्यासह नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राजेंद्र चव्हाणके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, रामभाऊ लोणारे यांच्यासह कोकाटे यांचे निकटचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाघ यांची उपस्थिती दबाव वाढविणारी
राजकीय चुकांबद्दल भुजबळांकडून दिलगिरीसोबतच भविष्यातील राजकारण व विधानसभा निवडणुकीत मदत करण्याच्या ठोस अटींवर कोकाटे भुजबळांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, बाळासाहेब वाघ यांनी उघडपणे गोडसेंचा प्रचार सुरू केला असताना त्यांची पत्रकार परिषदेतील उपस्थिती राष्ट्रवादीवरचा दबाव वाढवण्यासाठी असण्याची शक्यताही आहे.