आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Kokate News In Marathi, Narayan Rane, Congress, Divya Marathi

कोकाटेंच्या नाराजीवर नारायण अस्त्राचा होणार वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंधुदुर्गमधील राष्‍ट्रवादीच्या असहकाराचे उदाहरण देत नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रचारापासून दूर असलेल्या राणेंचे कट्टर समर्थक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मनधरणीसाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांचीच सभा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.नाशिक व सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राष्‍ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा वाद आहे. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश यांच्या प्रचारापासून आमदार दीपक केसरकर व समर्थक दूर आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राष्‍ट्रवादीकडून आणलेल्या अडचणीची परतफेड नाशिकमध्ये करण्याची भाषा कोकाटे समर्थकांकडून होत आहे. नाशकात भुजबळ यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक राहिलेल्या कोकाटेंनी यंदा सिंधुदुर्गमधील असहकाराचे उदाहरण देत भुजबळ यांच्या प्रचारापासून स्वत:ला अलिप्त ठेवले आहे. अर्थातच पक्षाकडून दबाव असल्यामुळे काही कार्यक्रमांना त्यांनी नावापुरतीच हजेरी लावली. दुसरीकडे कोकाटे यांच्या कट्टर समर्थकांनी थेट प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केल्यानंतर अशा कृतींनाही त्यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा झाली. मात्र, या चर्चेचे खंडन करून वा बंडखोरांना आवर घालण्यासाठी पाऊले उचलली न गेल्यामुळे त्यात तथ्य असल्याचेही बोलले गेले.


आता माणिकराव कोकाटें यांची समजूत घालण्यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माणिकराव कोकाटे यांचे श्रद्धास्थान असलेल्या नारायण राणे यांचीच सभा सिन्नरमध्ये घेण्याची खेळी खेळली जात आहे. त्यासाठी नारायण राणे यांच्या संपर्कात खासदार समीर भुजबळ असल्याचे समजते.