आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज नायरला 23 पर्यंत कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - देवळाली गावातील गवळीवाडा येथील अवैध गोदामात गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी अटक केलेल्या मनोज उर्फ बट्टू नायर यास न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अनिल माधव नायर हा संशयित जखमी असून, रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. नायरचा भागीदार जयेश मकवाना फरारी असल्याचे वरिष्ठ निरीक्षक जे. एन. कढरे यांनी सांगितले.
दुर्घटनेच्या दुस-या दिवशी गवळीवाड्यात शांतता होती. स्फोटात उद्ध्वस्त झालेले गोदाम पाहण्यासाठी नागरिक येत होते. मात्र, तेथील रहिवासी याबाबत कोणाशीही बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचण येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भरवस्तीत हा अवैध व्यवसाय सुरूअसताना पोलिसांना माहिती कशी नव्हती, या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर देण्याचे टाळले.
12 कार्डे जप्त - पोलिसांना नायरच्या घराच्या झडतीत दोन गॅस एजन्सीची 12 कार्डे सापडली. जखमी अनिल नायर व जयेश मकवाना यांच्या झडती व चौकशीत आणखी काही ग्राहकांची कार्डे व एजन्सीची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी एजन्सीचे संचालक व गॅस वितरण करणा-या कर्मचा-यांची चौकशी केली. एकाकडे 12 कार्डे कशी, ज्यांची कार्डे आहेत त्यांना सिलिंडर मिळाले की नाही, त्याची नोंद करण्यात येते का, असेल तर ती कशी, याची विचारणा पुरवठा अधिका-यांना पत्र देऊन करण्यात येणार आहे. पुरवठा विभागाचे कोणते नियंत्रण एजन्सीवर आहे, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, अवैधरित्या व्यवसायासाठी सिलिंडर घेणा-या व्यावसायिकांची माहिती घेऊन त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा चाले व्यवसाय - नाशिकरोडच्या दोन एजन्सीकडून नियमित ग्राहकांच्या कार्डवर घरगुती वापराचे सिलिंडर विकत घेऊन त्यातील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये टाकला जात असे. ते सिलिंडर व्यावसायिक दराने व्यावसायिकांना विकले जात होते. घरगुती सिलिंडर 410 रुपयांना घेऊन ते 1370 रुपये व्यावसायिक दराने विकत नायर-मकवाना मोठा नफा कमवत होते.