आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात कुशल मनुष्यबळ विकासासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्येही कुशल मनुष्यबळ विकसित व्हावे, यासाठी सिटीझन फोरमने एक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. यानुसार सिटीझन फोरमअंतर्गत येणार्‍या अनेक संघटना एकत्रित काम करणार असून, येत्या तीन वर्षात दीड लाख लोकांना प्रशिक्षणाची योजना आखली आहे. नाशिक देशाच्या नकाशावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध असलेले स्मार्ट शहर म्हणून ओळखले जावे व त्यामाध्यमातून उद्योग आणि गुंतवणूक शहरात यावी, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार असल्याचे सिटीझन फोरमचे अध्यक्ष जितूभाई ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरविकासात मोलाची भूमिका बजावणार्‍या सिटीझन फोरमच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त संलग्न संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर नाइस येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत ठक्कर बोलत होते. माजी अध्यक्ष विक्रम सारडा, डॉ. नारायण विंचूरकर, सचिव सुनील भायभंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय सानप, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश चव्हाण आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात कुशल मनुष्यबळ विकासावर भर दिला असून, सन 2020 पर्यंत देशात 65 टक्के लोकसंख्या ही तरुणांची असेल आणि हीच आपली ताकद असेल, असे सांगत यामुळेच कौशल्य विकसित होण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले होते. याकडे सिटीझन फोरमने लक्ष केंद्रित केल्याचे ठक्कर यांनी याप्रसंगी सांगितले.
.. असा राबविला जाणार ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक सभासदाकडून एका व्यक्तीची प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात येणार आहे. ही व्यक्ती घेतलेले प्रशिक्षण आणि मिळविलेले ज्ञान आपल्या संस्थेत परतल्यावर तेथील सहकार्‍यांना देईल. निमा, आयमा, लघुउद्योग भारती यांच्या माध्यमातून उद्योगांत ट्रेड युनियनच्या माध्यमातून व्यापार क्षेत्रात, बांधकामक्षेत्रातील चाकरमान्यांचे कौशल्य विकसन केले जाणार आहे.