आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manse BJP News In Marathi, Manse BJP May Coordinate, Divy Marathi

संकेत मनसे-भाजप मनोमिलनाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेतील सत्तेत काडीमोड घेण्यापर्यंत येऊन ठेपलेल्या मनसे आणि भाजप युतीचे गोदापार्कच्या निमित्ताने पुन्हा एकवार मनोमिलन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराज भाजपशी एकप्रकारे समझोता करून त्यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळेच शनिवारी (दि. 22) होणार्‍या गोदापार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसेने भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना निमंत्रण दिले आहे.
जानेवारीमध्ये नाशिक दौर्‍यावर आलेल्या राज यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यामुळे महापालिकेत सत्तेत सहभागी भाजपने लगेचच मनसेशी काडीमोड घेण्याचे पत्र वरिष्ठांना धाडले होते. यामुळे पालिकेतील सत्तेचे नेमके काय होणार, याची चर्चा सुरूअसतानाच आता गोदापार्कच्या भूमिपूजनाला गडकरी हजेरी लावत आहेत. शहरात उद्योजकांच्या परिषदेला गडकरी येणार असल्याने मनसेचे आमदार वसंत गिते यांनी गडकरींशी चर्चा करून या कार्यक्रमासाठी त्यांची वेळ निश्चित केली. राज हेही गडकरींशी बोलले.
पत्रिका साहेबांकडूनच फायनल : गोदापार्क भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेला स्वत: राज ठाकरे यांनीच अंतिम स्वरूप दिले. त्यात ‘राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्क नूतनीकरण भूमिपूजन समारंभ’ या उल्लेखाव्यतिरिक्त ठाकरे यांचे कोठेही नाव नाही हे विशेष.
पालकमंत्र्यांना निमंत्रणच नाही
गोदापार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमावर पालकमंत्री छगन भुजबळ हे बहिष्कार टाकणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांना विचारला असता, मनसेने पालकमंत्र्यांना निमंत्रणच दिले नसल्यामुळे बहिष्काराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.