नाशिक - महासभेत निधीवरून नगरसेवकांचा भडका उडाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमाेर प्रशासकीय अडवणुकीबाबत नगरसेवकांबराेबरच खुद्द महापाैर अशाेक मुर्तडक यांनीच तक्रार करून राज्य शासनाचे अधिकारी कशा पद्धतीने अडथळे अाणतात, याकडे लक्ष वेधल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले अाहे. शहर स्थानिकांचे असून, त्यांचे प्रश्न साेडवता येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांनी मूळ सेवेत जावे, असेही त्यांनी सुनावल्याचे वृत्त अाहे. एकप्रकारे अायुक्तांनाच हा अप्रत्यक्ष टाेला असल्याचे मानले जात अाहे.
अार्थिक वर्ष संपण्याची वेळ अाल्यानंतरही नगरसेवकांना ५० लाखांचा निधी मिळालेला नव्हता. तिजाेरीत पैसे नाही असे कारण देत नगरसेवकांची किरकाेळ कामे अडवली जात असल्यामुळे महापाैरांनाच जाब विचारला. अखेर स्थायी अंदाजपत्रकानुसार कामे मंजूर करावी, असे सांगत महापाैरांनी सुटका केली तरी, या सर्व प्रकाराला प्रशासकीय अडवणूक कारणीभूत असल्याचे नगरसेवक म्हणाले. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्यासमाेर वनाैषधी उद्यानाच्या रखडलेल्या कामाचा विषय अाल्यावर महापाैरांसह नगरसेवक अाक्रमक झाले. नगरसेवकांची फाइल अडवणे, ठेकेदारांची देयके अकारण राेखणे यामुळे महापालिकेचे नाव काळ्या यादीत जाईल भविष्यात काेणी काम करणार नाही, हे महापाैरांनीच कानावर घातल्याचे सांगितले जाते. वर्षांसाठी नियुक्त अधिकाऱ्यांकडून शहराचे वाटाेळे हाेईल, अशीही भीती व्यक्त केली.
जागेची एल अॅण्ड टी कडून पाहणी
सीएसअार अॅक्टिव्हिटीमधून गरवारे पाॅइंट ते के. के. वाघ या सुमारे ७.५ किमीवरील उड्डाणपुलाखालील जागेचा उद्यान, जाॅगिंग ट्रॅक, फ्लावर बेड लॅण्ड स्केपिंगच्या माध्यमातून कायापालट करण्याचा प्रयत्न अाहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी एक तास एल अँड टीच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर पपया नर्सरी येथे जाऊन शाेभिवंत पर्यावरणपूरक झाडे काेणती हेही त्यांनी बघितले.
मनसेने अाता नाशिक शहरातील मूलभूत प्रश्नांच्या दृष्टीने घंटागाडी, सफाई कर्मचारी पेस्ट कंट्राेलच्या ठेक्याकडे लक्ष केंद्रित केले अाहे. ३०० काेटी रुपये खर्च करून दहा वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्याचा प्रस्ताव शहराच्या दृष्टीने अव्यवहार्य असल्याचे सांगत यापूर्वीच फेटाळण्यात अाला अाहे. मात्र, शहरातील स्वच्छतेचे कारण देत पुन्हा संबंधित प्रस्ताव मंजुरीचे प्रयत्न सुरू अाहेत. सुरत दाैऱ्यात पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ग्लाेबल कंत्राटाद्वारे कशा पद्धतीने ठेका दिला याचे दर्शन मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतले अाहे. पेस्ट कंट्राेलची व्यवस्थाही बघितल्यामुळे अाता घंटागाडी पेस्ट कंट्राेलच्या मुद्याबाबत मनसे व्यवहार्य प्रस्ताव कसा असावा याबाबत अभ्यास करीत अाहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी रद्द करण्याचे अादेश दिले असून, स्थानिक भूमिपुत्रांनाच राेजगार द्यावा त्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मान्यता मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी अाश्वासन दिल्याचे सांगितले जाते.