आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भावांचा वाद, मांत्रिकाने जादूटोण्याच्या भीतीने एकाच्या मुलीला वश करत उकळले 15 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोंदूबाबा पांडे - Divya Marathi
भोंदूबाबा पांडे
नाशिक- एका प्रतिष्ठित कुटुंबातील दोन भावांमध्ये फ्लॅटच्या हॉलमध्ये बांधलेल्या भिंतीवरून वाद पेटल्यानंतर एका भोंदूबाबाने करणी करत ही भिंत काढण्याचे आमिष दाखवत त्यातील एका भावाला भुलवले. भोंदूबाबाने त्यानंतर आपली खेळी खेळत कुटुंबीयांना तंत्रमंत्राच्या मोहपाशात अडकवून याच कुटुंबातील एका मुलीला वश करून तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्याच नातेवाइकांच्याच घरी चोरी करण्यास प्रवृत्त करून सुमारे पंधरा ते वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे पोलिसांत आलेल्या एका तक्रार अर्जाच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच भोंदूबाबाला रेल्वेस्थानकावर सापळा रचून अटक करण्यात अाली. याप्रकरणी वीरेंद्र नेमीचंद मुथा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार वीरेंद्र हे आई, पत्नी, मुलगा आणि मुलीसह सहवासनगर येथे राहतात. आईच्या नावे एक फ्लॅट आणि चार फ्लॅट वडिलांच्या नावावर आहेत. प्रत्येकी दोन फ्लॅट भाऊ नरेंद्र आणि वीरेंद्र वापरत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ नरेंद्र विभक्त रहात होता. मात्र, त्याने फ्लॅटच्या हॉलमध्ये भिंत बांधून पार्टिशन केले होते. यावरून दोघा भावांमध्ये वाद सुरू होते. फर्निचर बनवणारा ओमप्रकाश याने २०१६ मध्ये उदयराज रामआश्रम पांडे (रा. वांगणी अंबरनाथ, ठाणे) याची वीरेंद्र यांच्यासोबत ओळख करून दिली. भिंत काढण्यासाठी काही करता येईल का असे वीरेंद्र यांनी बाबाला विचारले. त्यानंतर बाबाने त्यासाठी पूजा करावी लागेल एक लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. सुरुवातीला विश्वास पटल्याने पैसे देण्यास वीरेंद्र यांनी नकार दिला. मात्र, बाबाने कोऱ्या कागदावर हळद, कुंकू, तांदूळ, बुक्का ठेवत हात फिरवला. यावर ‘साधना’ असे नाव उमटले. बाबाने हिनेच तुमच्यावर करणी केल्याचे सांगितले. भावाच्या बायकोचे नाव साधना असल्याने विश्वास पटल्याने वीरेंद्र यांनी पूजेसाठी एक लाख रुपये दिले. 

मी ही करणी दूर करतो असे सांगत चार दिवसांत भाऊ भिंत काढून घेईल, असे भोंदूबाबाने सांगितले. त्याच दिवशी वीरेंद्र यांची मुलगी बेशुद्ध झाली. तेव्हा याच बाबाने तिला शुद्धीवर आणल्याने वीरेंद्र यांचा बाबावरील विश्वास दृढ झाला. रात्री १२ वाजता बाबाने घरात एक तास पूजा केली, होम पेटवला. एक दिवा लावत हा दिवा ११ दिवस अखंड जळत राहिला पाहिजे असे फर्मान सोडले. धर्मात अखंड दिवा चालत नसल्याने वीरेंद्र यांच्या आईने पूजा फेकून दिली. मात्र, चार दिवसांनंतर आई, पत्नीचे दागिने तसेच रोकड गायब होऊ लागली. त्यानंतर गुरुवारी (दि. ९) नातेवाइक फिरोदिया यांनी त्यांच्या घरातून वीरेंद्र यांच्या मुलीने १४ लाख आणि दागिने चोरल्याची तक्रार पोलिसांत दिली. मात्र, दागिने फिरोदिया यांना परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलीकडून या भोंदूबाबाचा खरा डाव उघडकीस आला. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार दाखल होण्यापूर्वीच भोंदूबाबाला ताब्यात घेण्यात आले. औषध तस्लीम उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंध उच्चाटन कायद्यांतर्गत तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

वडिलांच्या मृत्यूची दाखविली भीती 
वीरेंद्रयांच्या मुलीला बाबाने तुला परीक्षेत जास्त गुण पडतील यासाठी पूजा करतो असे सांगितले. तसेच तुझ्या वडिलांनी पूजा अर्धवट सोडल्याने ते मरतील अशी धमकी दिली. तू पूजेसाठी पैसे दे, घरातील सर्व माहिती दे, बेशुद्ध पडण्याचे नाटक कर अशा बाबाच्या धमक्यांना घाबरून वीरेंद्र यांच्या मुलीने घरातील दागिने, रोकड आणि फिरोदिया यांच्या घरात चोरी केली. सुदैवाने पोलिसांत तक्रार अर्ज आल्याने एवढी मोठी रक्कम चोरी करण्याचा काय उद्देश असेल म्हणून सरकारवाडा पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत भोंदूबाबाचा बुरखा फाटल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. 

बाबाच्या मोबाइलमध्ये मुलींचे आक्षेपार्ह फोटो 
भोंदूबाबाच्या मोबाइलमध्ये पंधरा ते वीस मुलींचे आक्षेपार्ह फोटो मिळून आले आहेत. यामध्ये शहरातील काही मुलींचे फोटो आहेत. संशयिताने या मुलींची फसवणूक आणि त्यांचे शोषण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे संशयितावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रेल्वेस्थानकावर सापळा, पैसे घेताना बाबा अटकेत 
सहायक निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या पथकाने संशयिताला अटक करण्यासाठी डोंबिवली रेल्वेस्थानकावर सापळा रचला होता. पीडित मुलीने भोंदूबाबाला फोन करून पैसे घेण्यास बोलावले. काही वेळात बाबा रेल्वेस्थानकावर येताच पथकाने त्यास मुलीकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले. शिवाजी भालेराव, पंकज पळशीकर, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, सुनील जगदाळे, दीपक खरपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...