आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक बेकरी उत्पादकांकडून अन्न सुरक्षा कायदा पायदळी, नागरिकांच्या अाराेग्याशी खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धकाधकीच्या या जीवनात बेकरी पदार्थांना अधिक मागणी वाढू लागली अाहे. मात्र, याचाच गैरफायदा घेत सर्रास कायदा पायदळी तुडवत काही बेकरी उत्पादकांनी अस्वच्छ अन‌् अाराेग्यास बाधक जागांवरही उत्पादन घेण्यास सुरुवात केली अाहे. याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने पाहणी केली असता बेकरीचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य  उघड्यावर पडलेले, कर्मचाऱ्यांचे अस्वच्छ राहणीमान, परिसरातील घाण असे चित्र बघावयास मिळाले. मुख्य म्हणजे, या सर्व प्रकारांवर कारवाईचे अधिकार असलेल्या अन्न व अाैषध प्रशासनाकडून डाेळेझाकच केली जात असल्याने ‘कुणीही या, वाट्टेल तेथे बेकरी उत्पादन घ्या’ अशी स्थिती बघावयास मिळत अाहे. त्यावर हा प्रकाशझाेत...
 
नागरिकांचे अाराेग्य अबाधित रहावे, यासाठी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांसाठी केंद्र शासनाने अन्न सुरक्षा मानके कायदा लागू केला अाहे. या कायद्यातील सूचनांप्रमाणे  खाद्यपदार्थ तयार न करताच त्याची विक्री करणाऱ्या उत्पादकास व व्यावसायिकास शिक्षेची तरतूद अाहे. मात्र, शहरातील बहुतांश बेकरी उत्पादक हा कायदा पायदळी तुडवत असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.
 
या कायद्यातील तरतुदींनुसार खाद्यमाल तयार करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र अतिशय गलिच्छ व अस्वच्छ जागेवर बेकरीचे उत्पादन घेतले जाते. सातपूरमधील व्यावसायिकांनी तर कळसच गाठला अाहे. या परिसरात चक्क सार्वजनिक शाैचालयालगतच बेकरीचे उत्पादन घेतले जात अाहे. पैसे कमविण्यासाठी नागरिकांच्या अाराेग्याशी खेळण्याचा प्रयत्न बेकरी उत्पादकांकडून केला जात अाहे. तरीही अन्न व अाैषध प्रशासन विभाग याकडे साेयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत अाहे. मुख्य म्हणजे, हे प्रकार निदर्शनास अाणून दिल्यानंतरही प्रशासनाकडून ‘माेहीम राबवू, कारवाई करू’ अशी अाश्वासने मिळाली. यामुळे उत्पादकांचे धारिष्ट्य वाढले असून, नाागरिकांचे अाराेग्य मात्र धाेक्यात येत अाहे. विशेषत: लहान मुलांच्या अावडीचे पदार्थ बेकऱ्यांमध्येच तयार हाेत असल्याने प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने पावले उचलत वेळाेवेळी कारवाई करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात तसे हाेताना दिसून येत नाही.

‘डी. बी. स्टार’च्या प्रतिनिधींनी प्रातिनिधीक स्वरूपात  शहरातील काही बेकरी पदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली असता त्या ठिकाणी अतिशय अस्वच्छता तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणांवर बेकरीचे उत्पादन घेतले जात असल्याचे दिसून आले. त्याचबराेबर कर्मचाऱ्यांचे कपडे मळकटलेले, त्यांचे राहणीमान अस्वच्छ असे धक्कादायक चित्र बघावयास मिळाले. मुख्य म्हणजे, सातपूर परिसरात एका सार्वजनिक शाैचालयाजवळच बेकरी उत्पादन घेतले जात असल्याचेही दिसून अाले. अशा अाराेग्यास घातक प्रकारांकडेही पालिकेच्या अाराेग्य विभागासह अन्न व अाैषध प्रशासनाकडूनही डाेळेझाक केले जात असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. मुळात  या उत्पादकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यांचे ज्ञानच नसावे, असे स्पष्टपणे पाहणीतून जाणवते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईअभावी हे प्रकार सर्रास सुरू अाहेत.

प्रकरण १ : सातपूर विभागातील स्वारबाबानगर परिसरात असलेल्या दाेन बेकरी उत्पादकांकडे गेलाे असता येथील सार्वजनिक शाैचालयाच्या पाठीमागे बेकरीचे उत्पादन सुरू असल्याचे दिसून झाले. या व्यावसायिकाने रस्त्यालगतच ट्रेमध्ये उघड्यावरच पाव ठेवलेले हाेते. उघड्यावरच ट्रे असल्यामुळे माेकाट जनावरे ते खाण्याच्या प्रयत्नात हाेते, त्याला ताेंड लावत हाेते. तर वाहनांच्या वर्दळीमुळे या पदार्थांवर माेठ्या प्रमाणावर धूळही उडत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून अाला.
 
प्रकरण २ : अमरधामसमाेरील बेकरी उत्पादकानेही रस्त्याच्या कडेलाच अस्वच्छ जागेवर पाव असलेले ट्रे ठेवलेले अाढळले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची धूळ त्यावर उडत हाेती. त्याच्या शेजारीच सांडपाण्याची गटार वाहात हाेती. अन्नपदार्थ ठेवलेल्या गोडावूनमध्येही प्रचंड अस्वच्छता हाेती.कामगारांचे घाणेरडे कपडे, अन्न पदार्थावर डासांचा प्रादुर्भाव, फरशीची अस्वच्छता, भिंतीची दुरवस्था, सर्वत्र धूळ असे एकंदरीत बेकरी उत्पादनाच्या ठिकाणचे हे चित्र हाेते. सांडपाण्याच्या गटारावरच पदार्थांचे उत्पादन घेतले जात  असल्याचे दिसून आले.

प्रकरण ३ : गंजमाळ येथील जुन्या बसस्थानका समाेरील परिसरात असलेल्या एका बेकरीचा उत्पादित माल उघड्यावरच ट्रे मध्ये पडलेला हाेता. या मालावर माशा भिनभिनत हाेत्या. तसेच काेणत्याही खाद्य पदार्थांवर झाकण अाढळून अाले नाही.
 
प्रकरण ४ : भद्रकालीतील मुख्य मार्केट परिसरात असलेल्या छाेट्याशा बेकरीतही अतिशय गलिच्छपणा दिसून अाला. काेणत्याही प्रकारची स्वच्छता नसलेल्या या बेकरीत उत्पादित माल उघड्यावरच ठेवलेला हाेता. येथेही नियमबाह्यरित्या उत्पादन सुरू हाेते.

असे अाहेत अन्न सुरक्षा मानके कायद्याचे नियम...
बेकरीचे उत्पादन घेणाऱ्या जागेचे कपाउंड व अाजूबाजूचा परिसर स्वच्छ असायला हवा. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात उत्पादन घेण्यात येणारा कक्ष अत्यंत स्वच्छ पाहिजे, पक्के बांधकाम पाहिजे, फ्लाेरिंग एकसंघ पाहिजे, भिंतींना पाेपडे अालेले नकाे, याेग्य रंग दिलेला पाहिजे. कच्चामाल याेग्य ठिकाणी साठवला पाहिजे. उत्पादित केलेल्या मालासाठी स्वतंत्र कक्ष पाहिजे.बेकरी उत्पादन तयार करण्यासाठी अाणलेला कच्चा जमिनीपासून उंचावर (पॅलेटसवर) साठवला पाहिजे. कच्चामाल अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार असल्याची खात्री उत्पादकाने करून घेतली पाहिजे. परवानाधारकाकडूनच कच्चामाल खरेदी केला पाहिजे. उत्पादनासाठी वापरण्यात येणारी मशिनरी स्वच्छ पाहिजे. मशीन व्यवस्थित चालके कि नाही याबाबतचे अाॅडिट झालेले असणे अावश्यक अाहे. मशिनवर काम करणारे सुपरवायझर तज्ज्ञ पाहिजे. जेवढा कच्चामाल अाणला त्यापासून किती पक्का माल तयार केला याची नाेंद  ठेवली पाहिजे. तयार केलेल्या मालावर फुडग्रेड पाहिजे. त्यावर माल तयार करताना काेणते काेणते घटक वापरले अाहेत याबाबतची माहिती दिली पाहिजे. अन्न पदार्थ टेंगची लॅब असावी, नसल्यास  अंतिम उत्पादनाची बाहेरील लॅब मधून टेस्ट करून घ्यावी. बॅच नंबर टाकूनच विक्री करावी.  मजुरांची दर सहा महिन्यांनी खरूज, दमा, क्षयराेग यासारख्या अाजारांची तपासणी करून घ्यावी. मजुरांना अॅप्राॅन, डाेक्याला टाेपी, हातमाैजे अत्यावश्यक अाहे. तयार केलेल्या मालावर उत्पादनाची तारीख व किती दिवसांनी मुदतबाह्य हाेणार याबाबतची स्पष्ट नाेंद अावश्यक अाहे.

थेट प्रश्‍न 
उदय वंजारी, सहअायुक्त, अन्न व अाैषध प्रशासन
 
लवकरच विशेष तपास माेहीम हाती घेणार
{ शहरातील सर्व बेकरींची नियमित तपासणी हाेते का? जर हाेत असेल तर किती व्यावसायिकांना सुधारणा नाेटीस बजावण्यात अाली अाहे?
- शहरातील बेकरी तपासणीची माेहीम गेल्या डिसेंबर महिन्यात घेण्यात अाली हाेती. त्यापैकी ७ व्यावसायिकांना नाेटीस बजावण्यात अाली अाहे. तसेच, १६ नमुने तपासणीसाठी घेतले अाहेत.
 
{ तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यातील दाेषींवर काय कारवाई केली?
- तपासणीत दाेषी अाढळलेल्या बेकरी व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात अाली अाहे.
 
{ बेकरी उत्पादकांमध्ये सुधारणा करण्यासाठी अापल्या विभागामार्फत काय ठाेस उपाययाेजना केल्या जातील?
- बेकरींच्या तपासणीसाठी  विभागामार्फत लवरकरच विशेष माेहीम हाती घेऊ.
बातम्या आणखी आहेत...