आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिन एज पाेरींचेही दम माराे दम, अनेक युवती मादक पदार्थांच्‍या आहारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गांजा, चरस, वीड, हॅश हे शब्द अाता महाविद्यालयीन युवतींना अपरिचित राहिलेले नाहीत. किंबहुना काॅलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षीच अशा मादक पदार्थांचा चस्का चाखण्याचा ‘ट्रेण्ड’ नाशिकसारख्या शहरातही वाढत असल्याचे पाहावयास मिळते. केवळ गांजा, चरसच नव्हे तर हुक्का, बाॅन्ग अशा माध्यमातून अमली पदार्थांचे सेवन हाेत अाहे. याची सवय मुख्यत: सिगारेटपासून हाेत असल्याचे पुढे येते. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांशी बाेलल्यानंतर अनेकांचे अायुष्य या मादक पदार्थांच्या अाहारी जाऊन उद‌्ध्वस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव अाहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन युवती तसेच त्यांच्या पालकांच्या प्रबाेधनासाठी ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
 
सकाळी कॉलेजच्या नावाने बाहेर पडणारी लहानशी मुलगी तिच्या मित्रांच्या घोळक्यात बसलेली दिसते, हातात वीड किंवा गांजा असतो. जगाचा विसर पडलेला असतो, लालबुंद झालेले डोळे आणि बेफिकीर नजर असे हे दृश्य आता नाशिकमध्येही पाहावयास मिळत आहे. अगदी काॅलेजच्या पहिल्या वर्षात अथवा डिप्लोमा करणाऱ्या मुली या मादक सेवनाच्या अाहारी गेलेल्या दिसून येतात. 
 
वयाची १८ वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांच्या हातात आणि सवयींमध्ये वीड, गांजा, चरस आणि हॅशने जागा बनवली आहे. नाशिककरांसाठी तशी धक्कादायक असणारी ही गोष्ट सध्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. कॉफी बार्स असो किंवा स्मोकिंग झोन असोत, सिगारेट ओढणाऱ्या टिनएज मुलींचे प्रमाण वाढत चालले आहे. नुकत्याच शाळेतून बाहेर पडलेल्या, मित्रांच्या गर्त्यात हरवलेल्या मुलींचा यामध्ये समावेश आहे. अथक प्रयत्नानंतरही काहींची सवय सुटली नाही तर काही आपल्या व्यसनातून संपूर्ण बाहेर आल्या आहेत. 

या मुलींपर्यंत थेट गांजा, हॅश या गोष्टी कशा पाेहाेचतात याचा मागाेवा घेतल्यास ९९ टक्के मुली त्यांच्या मित्रांमार्फत गांजा, सिगारेट आणि अॅश घेतात. प्रत्येक आर्थिक स्तरांतील मुलींचा यात समावेश आहे. कोड लँग्वेज, व्हॉट्सअॅप ग्रुप्स, मित्रांचे सर्कल आणि प्रत्यक्ष पेडलर्सच्या भेटींमधून या मुली व्यसन करतात. पुणे, मुंबई पाठाेपाठ अाता नाशिकही ‘स्माेकर्स’च्या धुरात हरवत चाललंय अाणि त्यामुळे प्रशासनापुढे मात्र अाव्हान वाढतेय. अाज महिला दिनाच्या निमित्ताने ‘डी.बी. स्टार’ने या विषयाला हात घातला अाहे ताे युवतींचे प्रबाेधन व्हावे तसेच पालकांनाही सावधानतेचा इशारा मिळावा, या हेतूने.

कसे लक्षात येईल व्यसन? 
{ जास्त पैसे मागण्याची सवय घातक असू शकते. 
{ पैसे कुठे वापरले जातात याचा हिशेब न देणे. 
{ प्रमाणापेक्षा जास्त लाल झालेले डोळे (सातत्य हवे) 
{ गांजाचा वास इतर धुरांपेक्षा उग्र असतो. 
{ अस्वस्थ स्वभाव, वाढती अस्वस्थता. 
{ जेवणाचे प्रमाण या मुलींमध्ये अत्यंत कमी असते. 
{ जास्त सवय असल्यास मासिक पाळी लांबण्यासारखे गंभीर परिणामही दिसतात.

माेठे रॅकेट; टिन एजर मुलींचे प्रमाण वाढतेय..
हे अगदी खरे आहे की, नाशिकमध्ये टिन एज अॅडिक्शनचे प्रमाण खूपच वाढले आहे. मुलांमार्फत या गोष्टी मुलींपर्यंत पोहोचत आहेत. आतापर्यंत थेट मुली काऊन्सिलिंगसाठी आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत, पण मुलांच्या माध्यमातून हेच लक्षात येते की मोठ्या शाळांमधील ३० ते ४० टक्के टिन एजर मुली या अॅडिक्टेड आहेत. शिवाय, नाशिकमध्ये हे प्रमाण ३० टक्के असण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. मुलींमधील व्यसनाधीनता ही सुप्त अवस्थेत आहे, याचा अर्थ असा नाही की त्या व्यसनाधीन नाहीत.
 
मुली सगळ्या प्रकारच्या व्यसनांनी ग्रासलेल्या आहेत. यामध्ये दारू, तंबाखू, अफू, चरस आणि गांजाचेही प्रमाण आहे. यात प्रामुख्याने क्रीम क्लास आणि अतिशय खालच्या आर्थिक स्तरातील मुला-मुलींचाही सहभाग आहे. त्यातही नाशिकरोड आणि क्रीम परिसरात हे प्रमाण अधिक सापडते. नाशिकमध्येही व्यसने आणि ड्रग्स पुरवणारे कोटा, मुंबईप्रमाणेच मोठे रॅकेट कार्यान्वित असल्याचा दाट संशय अाहे. सुरुवातीला ते मुलांना मोफत गांजा आणि इतर अमली पदार्थ पुरवतात. यानंतर त्यांच्याच माध्यमातून मुलींनाही सवय लावली जाते. असा एकंदरीतच त्यांचा व्यवसाय वाढत आहे. - अमोल कुलकर्णी, मानसविकासतज्ज्ञ, चेतना व्यसनमुक्ती केंद्र (१६ वर्षे अनुभव)

लत लग गई...
- पहिले सिगारेट नंतर गांजा घेऊ लागली, कारण सिगारेटचा वास घरी कळायचा. आता ताेही कळत नाही, कारण तो घालवायचा कसा हे माहीत झालंय. अकरावीला असताना पहिल्यांदा सिगारेट मारली. आता ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात दिवसाला ६ सिगारेट होतात. इथेच शिकायला मिळतं आणि इथेच करायला मिळतं, अापाेअाप सवय लागते. फार महाग पण नाही सिगारेट. वय वगैरे काही नसतं... मोठ्या मित्रांना पाठवलं की त्यांच्याकडून सिगारेट सहजचं मिळते...

- दिवसाला ४-४ सिगारेट मारायचो, नंतर तर गांजाही सुरू केला होता. मुले आणूनही द्यायची ग्रुपमधली. मग आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर (कॅफेच्या नावे असलेला ग्रुप दाखवला) कुठे भेटायचं तो मेसेज येतो. आम्ही सगळे सोबत खूप भारी-भारी गोष्टी ट्राय करायचो. एकदा घरी कळून गेलं मी पैसे का घेतले. त्यानंतर बंद करून ठेवलेलं घरात, आईची खूप रडरड झाली. त्यानंतर मात्र हे सगळं सोडून दिलं. पुन्हा नाही करणार अाता असं काही...

- कधीच विचार केला नव्हता की, गांजासारख्या गोष्टीची सवय लागेल. सुरुवातीला मित्र स्मोकिंग करायचे आमच्यासमोर म्हणून स्मोकिंग करण्यासाठी सहज हट्ट केला होता. त्यात त्यांनी तंबाखूचा त्रास होतो म्हणून वीड मारायला लावली, ही गोष्ट एकावर थांबत नसते. पालापाचोळा असला तरी खूप सवय लागते. आता गांजा दिवसरात्र कुठे मिळतो माहीत आहे. ही गोष्ट मागे घरी कळाली होती, घरात एक पाकीट सापडले. घरच्यांना कसेबसे पटवले की तो गांजा नाही. सकाळी बाहेर पडल्यावर दिवसभरात दोनदा तरी गांजा मारला जातो. संध्याकाळी उशिरापर्यंत क्लासेस असतात. त्यामुळे घरी पण जावे लागत नाही, बाकी मित्र-मैत्रिणींना माहीत असतं काय केलंय, ते काही नाही बोलत. सिगारेटपेक्षा गांजाचा त्रास कमी असल्याची सवय लागली. महिन्याला साधारण ५००-६०० रुपये यात जातात. मात्र, गांजा मारल्याशिवाय चित्त स्थिर होत नाही. - बारावीची विद्यार्थिनी
 
दृष्टिक्षेपात...
{ ८० टक्के सिगारेट पिणाऱ्या मुली गांजा पितात. 
{ नाशिकमध्ये सगळ्या प्रकारचे अमली पदार्थ उपलब्ध होतात. 
{ गांजा पिणाऱ्या मुलींचा वयोगट १६पासून आहे. 
{ हर्बल नावाने अाता गांजाचा वाढताेय खप. 
{ नाशिकचा गांजा उत्तम समजला जातो, त्यामुळे अनेकांना या गांजाची विक्री करून पैसे कमावण्याची सवय लागली आहे. 
{ फक्त पैसे कमावण्यासाठी कुंडी, गार्डनमध्येही गांजाचे पीक घेतले जातेय. 
{ गांजा पिणाऱ्या मुली आणि मुले बॉब मार्लीला देव मानत असल्याचेही सांगण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...