आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Reservation News In Marathi, Divya Marathi, Nashik

मराठा आरक्षण सर्वेक्षण मुदत संपूनही अपूर्णच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मराठा समाज आरक्षणासंदर्भातील 25 फेब्रुवारीपर्यंत सादर करणे अपेक्षित असलेला सर्वेक्षण अहवाल अद्यापही सादर झाला नसून, जिल्ह्यात 61.58 टक्केच अर्ज ऑनलाइन भरण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागातून 93 टक्के, तर शहरातून अवघे 36 टक्केच काम 12 मार्चपर्यंत झाले असल्याने यंदाच्या निवडणूकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता कमीच आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नारायण राणे समितीने 25 फेब्रुवारीपर्यंत जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण करून, दुसर्‍या दिवशी लगेचच अहवाल शासनास ऑनलाइन सादर करण्याचे आदेश होते. मात्र, जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी पेठ, येवला, मालेगाव, कळवण, देवळा या पाच तालुक्यांचेच ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम बुधवारपर्यंत (12 मार्च) पूर्ण झाले. अन्य तालुक्यांचे काम सरासरी 90 टक्के झाले आहे. एकूण 191 गावांतील 307 गटांची व त्यातील 37 हजार 757 कुटुंबांची निवड झाली. यापैकी 36 हजार 383 कुटुंबपत्रके भरून घेण्यात आली आहेत. 35 हजार 303 कुटुंबांनी अर्ज ऑनलाइन भरले, तर 1,374 कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. नाशिक व मालेगाव महापालिका, आठ नगरपालिका आणि देवळाली कटक मंडळ अशा 445 गटांची निवड त्यासाठी केली आहे. तसेच 47 हजार 116 कुटुंबांची निवड झाली असून, 42 हजार 59 कुटंबांची पत्रके भरून झाली आहेत. त्यापैकी 16 हजार 958 अर्जच ऑनलाइन भरण्यात आले. जवळपास 30 हजार अर्जांची माहिती ऑनलाइन भरून शासनाकडे पाठवणे अद्याप बाकी आहे.