आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Vidya Prasarak Samaj Mandal Meetiong Clashes Nashik

‘टीडीआर’ रक्कम गेली कुठे; मविप्र संस्थेच्या सरचिटणीस-अध्यक्षांचा सभागृहासमोर वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. टीडीआर विक्रीतून मिळालेल्या साडेसहा कोटींच्या रकमेचा अहवालात समावेश नसल्याचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहातील सभासदांनी ही रक्कम कुठे गेली, असा प्रश्न विचारला. सभासद, काही मंडळी गोंधळ निर्माण करून त्यांना बोलू देत नसल्याचा प्रकार घडला. याचा फटका खुद्द सभेच्या अध्यक्षांनाही बसला. अखेरीस सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभेचा ताबा घेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत सभा पार पाडली.

संस्थेच्या सर्वसाधारण सभेत होणार्‍या गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली. रावसाहेब थोरात सभागृहात संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सरचिटणीस नीलिमा पवार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. यात संस्थेचा यंदाचा अर्थसंकल्प 439 कोटींपर्यंत पोहोचला असून, कार्यकारिणीने 50 कोटींचे कर्ज मंजूर केले असल्याचे व अजूनही 100 कोटींचे कर्ज काढावे लागणार आहे, हे नमूद केले. पवार यांचे बोलणे संपताच सभासद बाळासाहेब कोल्हे यांनी टीडीआर विक्रीतून मिळालेल्या 6 कोटी 50 लाखांच्या रकमेचा अहवालात समावेश नसल्याने ही रक्कम गेली कोठे, असा सवाल केल्याने गोंधळ सुरू झाला. तरीही कोल्हे यांनी माईक ताब्यात ठेवत आपले बोलणे सुरूच ठेवल्याने सरचिटणीसांसह संचालकांनी त्यांच्याकडे येऊन त्यांना गप्प केले. इतिवृत्त वाचून हेाताच पुन्हा कोल्हे यांनी व्यासपीठावर जाऊन रकमेच्या हिशेबाची मागणी करताच गोंधळ होऊन काही सभासद व इतर कर्मचार्‍यांनी त्यांना हाताशी धरून जबरदस्तीने खाली खेचले.

कोतवालांनी घेतला माईकचा ताबा : यानंतर ज्येष्ठ सभासद पुंडलिकराव थेटे यांनी संस्थेच्या घटनेत खासगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद असणार्‍यांना निवडणूक लढण्याची मनाई करण्यात आली आहे. तरीही मुरलीधर पाटील यांनी गंगापूरच्या ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष असताना निवडणूक लढविल्याने त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली. त्याचवेळी इतरांनी थेटे यांनाही खाली बसविण्याचा प्रयत्न करून माईकचा ताबाही घेतला. गदारोळ थांबत नसल्याचे बघून संचालक तथा आमदार शिरीष कोतवाल यांनीच माईक हातात घेत थेटे यांचा मुद्दा गैर असल्याचे म्हटले व मंजूर-मंजूर म्हणून सभा पुढे चालविली. मात्र, काही सभासदांनी यावर उघड नाराजी व्यक्त करीत सत्ताधार्‍यांचे सर्वच खरे असले तरी बोलू देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

कर्जाचे अधिकार उपसभापतींना : संस्थेच्या प्रगतीसाठी 50 ते 100 कोटींपर्यंत कर्ज घ्यावे लागणार आहे. मात्र, कर्जप्रस्तावावर सभापती स्वाक्षरी करीत नसल्याने अडचणी निर्माण होतात. यावर उपसभापतींना अधिकार द्यावेत का, असा प्रश्न पवार यांनी सभासदांना विचारताच एकमताने होकार देत उपसभापती नानाजी दळवी यांना स्वाक्षरीचे अधिकार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याचवेळी माजी संचालक मोहन पिंगळे यांनी संस्थेने अंजना ठमके या राष्ट्रीय सुवर्णपदकविजेत्या मुलीला वसतिगृहास प्रवेश दिला नसल्याने संस्थेने मोठी चूक केल्याचे सांगितले होते. यावरही पवार यांनी असे काही झाले नसून, आपल्याकडे राष्ट्रीय कोच नसल्याने भोसलाच्या विजयेंद्रसिंग यांनीच तिला आपल्याकडून नेल्याचे जाहीरपणे सांगितले.

सभागृह पडले अपुरे : सभागृहाची आसनक्षमता हजार ते दीड हजार असून, संस्थेच्या सभासदांचा आकडा नऊ हजारांच्या घरात असताना सभागृह अपुरे ठरले. त्यामुळे पुढील सभा मोठय़ा सभागृहात घेण्याची मागणी करण्यात आली. सभेत सभासदांव्यतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी, संचालकांचे चालक, शिपाई इतर मंडळीच मोठय़ा संख्येने उपस्थित असल्याबाबतही सभासदांनी नाराजी व्यक्त केली.

21 कोटी 50 लाखांच्या मुदत ठेवी
टीडीआर विक्रीतून मिळालेल्या एकूण 21 कोटी 50 लाखांच्या रकमेच्या बॅँक ऑफ महाराष्ट्रात सहा वर्षांसाठी मुदत ठेवी ठेवल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. धर्मादाय आयुक्तांकडून फेरफार अहवाल फेटाळल्याने अडचण येणार नाही. सभेला सर्वाधिकार असून, निवडून आलेली कार्यकारिणी आहे. धर्मादाय सहआयुक्तांना वेळ मिळेल तेव्हा ते नवीन कार्यकारिणीला मंजुरी देतील, सद्यस्थितीत धर्मादाय विभागाकडे जुनीच कार्यकारिणी आहे. संस्थेच्या हितासाठीच दोन नावाने संस्था होती. मात्र, 2008 मध्ये सभेच्या ठरावानुसार सध्याचे नाव कायम ठेवले असून अध्यक्षांनी आणखी अभ्यास करावा असा टोलाही त्यांनी लगावला.

सर्वसाधारण सभेच्या वैधतेवर अध्यक्ष सोनवणे यांनी लावले प्रश्नचिन्ह
सभेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी म्हटले की, संस्थेच्या नवीन कार्यकारिणीच्या मंजुरीचा धर्मादाय उपआयुक्तांकडे संस्थेने सादर केलेला फेरफार अहवाल फेटाळल्याने ही सभादेखील अवैध ठरण्याची शक्यता आहे. संस्थेचा 2007 ते 2012चा फेरफार अहवाल मंजूर होत नसल्याने संस्था अडचणीत सापडली असून, या कार्यकाळातील कारभार बेकायदेशीर ठरविला आहे, यावर सभेत विचारविनिमय व्हावा. तसेच, आर्किटेक्चर कॉलेजची मान्यता रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला.

शतकोत्तरी महोत्सव अध्यक्षपदी वनाधिपती
मविप्र समाज संस्था शताब्दी वर्ष साजरा करत असून, संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापेक्षा अधिक उत्कृष्ट असा शतक महोत्सव वर्षभर साजरा करण्याची सभासदांनी सूचना केली. यावर सरचिटणीस पवार यांना महोत्सव समिती अध्यक्षपदी वनाधिपती विनायकदादा पाटील यांची निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

अवयवदान चळवळ राबविण्याची सूचना
डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान चळवळ राबविण्याची सूचना केली. मूत्रपिंड, डोळे यांसह अनेक अवयवांची रुग्णांना आवश्यकता असते. यासाठी रुग्णालयात अपघातातील जखमी किंवा दुर्धर आजाराच्या रुग्णाचा मेंदू मृत झाल्यास त्यांच्या नातलगांचे प्रबोधन करून त्यांना अवयवदानासाठी प्रवृत्त करण्याकरिता सभासदांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.