आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत नाशिकच्या अंजलीची पाटीलकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- श्रीलंकन चित्रपट ‘विथ यू विदाउट यू’मध्ये नैसर्गिक अभिनयाबद्दल गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नाशिकच्या अंजली पाटील या तरुण, देखण्या अभिनेत्रीचा अभिनयप्रवास प्रादेशिकतेकडून जागतिक स्तरापर्यंत गेलेला आहे. सध्या ती करीत असलेला ‘अपना देश’ हा कन्नड चित्रपट चित्रीकरणाच्या प्रक्रियेत असून, काही दृश्यांसाठी पावसाची वाट बघतो आहे.

लहानपणापासूनच आपण चित्रपट, मालिका यांसारख्या दृश्य माध्यमाला अत्यंत सहजतेने सामोरे जात असतो. त्यामुळे प्रत्येकात अभिनय दडलेला असतो. फक्त तो व्यक्त करण्याची तर्‍हा बदलते. कुणी प्रत्यक्ष चित्रपटक्षेत्रात उतरतं तर कुणी चित्रपट बघण्यापुरतेच र्मयादित राहातं. मी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीनेच करिअर करायचं ठरवलं. मूळची नाशिकची असलेली व ‘चक्रव्यूह’ चित्रपटामुळे प्रकाशात आलेली नवोदित अभिनेत्री अंजली पाटील आपल्या या अभिनय प्रवासाबद्दल ‘दिव्य मराठी’शी बोलत होती. सध्या ती गिरीश कर्नाड यांच्याबरोबर ‘अपना देश’ ही कन्नड फिल्म करते आहे.

एनएसडीत घेतलं शिक्षण : नाशिकमध्ये बारावी सायन्स पूर्ण केलेल्या अंजलीला मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. पण, चित्रपटक्षेत्र खुणावत होतं आणि तिनं पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये प्रवेश घेतला. त्याआधी तिनं कथ्थक नृत्याचं दोन वर्षे शिक्षण घेतलं. तिची बहीण अर्चनाने मात्र पाच वर्षे कथकमध्ये शिक्षण घेतलेय. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये सिनेमॅटोग्राफी आणि दिग्दर्शन शिकून सिनेमा करते आहे. अंजलीने मात्र कथ्थकमध्ये आधी नृत्यकौशल्य अधिक लागतं व नंतर अभिनय येतो म्हणून ललितमध्येच अभिनय शिक्षणावर फोकस ठेवला. यादरम्यान सतीश आळेकरांची नाटके, शेक्सपिअरची नाटके, एलकुंचवारांची नाटके अशा अनेक मान्यवर, प्रथितयश नाटकांच्या अभ्यासातून तिला अभिनयाचे बारकावे कळत गेले. पण, या बारकाव्यांचा अभ्यास तिने दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) केला. तिथं तिनं दिग्दर्शनाचं शिक्षण घेतलं. या दिग्दर्शनाच्या शिक्षणाचा अनुभव तिच्यासाठी बेस्ट एक्सपिअरन्स होता असं ती आवर्जून सांगते.

अनुभवाचा मिळाला फायदा : श्रीलंकन चित्रपट ‘विथ यू विदाउट यू’ या चित्रपटात आपल्या सहा ते सात वर्षांचा अभिनय व दिग्दर्शनाचा अनुभव तिने या चित्रपटातून अँप्लाय करून पाहिला. अंजली सांगते, ‘माझा मुळात पिंडच ट्रॅव्हलरचा होता. मला नवीन माणसांना भेटायचं होतं, संहितेतून तर कधी प्रत्यक्ष. नाशिक-पुणे-दिल्ली आणि आता मुंबई असा प्रवास करताना अनेक लेखक, दिग्दर्शक कळत गेले, जे मला माझी स्वत:ची अभिनयशैली विकसित करण्यासाठी पूरक ठरले.’

प्रेक्षकांना हवा असतो चांगला चित्रपट
अंजलीला चित्रपट समांतर, व्यावसायिक अशा वर्गांमध्ये विभागायला आवडत नाही. असं वर्गीकरण करण्याचा काळ गेला आहे, असं तिला वाटतं. त्यामुळे तिचा चॉइस हा समांतर-व्यावसायिक अशा गटात बसत नाही. मात्र, चांगला निर्माता, चांगलं कथानक आणि योग्य भूमिका मात्र हवी हे फिल्टर्स तिच्या निवड पद्धतीमध्ये अनेक पुरस्कार मिळाल्याने, प्रारंभीच चांगले चित्रपट केल्याने कळत-नकळत लागले आहेत, असं ती प्रांजळपणे सांगते. प्रेक्षकांना फक्त चांगला चित्रपट हवा असतो त्याला असं अमुक एक समांतर, अमुक एक व्यावसायिक याच्याशी देणं-घेणं नसतं याबाबत ती आपला एक अनुभव सांगते. ‘लाइफ ऑफ पाय’ हा चित्रपट ती दुपारी 2 वाजता मल्टिप्लेक्समध्ये बघायला गेली होती. दुपारचा शो, पण तरीही सगळे सहकुटुंब आले होते, 50 टक्के थिएटर भरलेलं होतं. हा बदल जर प्रेक्षकांमध्ये होतो आहे, तर मी करत असलेला चित्रपट हा चांगला असणं फक्त महत्त्वाचं आहे, असं ती म्हणते.

नाशिक मेरी जान है..
नाशिकबद्दल तिनं अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली, ‘नाशिक मेरी जान है. ‘सायंतारा’चे साबूदाणे वडे आणि कृष्णाईचा वडापाव, केटीएचएमचा बोट क्लब या तर माझ्या खास आठवणी आहेत. मी नाशिकरोडच्या बिटको शाळेत शिकले, केटीएचएममध्ये बारावीपर्यंत शिकले. माझ्या मनात नाशिक म्हटलं की, अनेक आठवणी दाटून येतात. नाशिकमध्ये मी रंगभूमीवर काम केलेलं नाही. पण, नाशिकचं सांस्कृतिक क्षेत्र विस्तारावं असं मला वाटतं,’ असं सांगत तिनं नाटकासाठी तयारी खूप करावी लागते जी सध्या जमणं मला अवघड आहे, हेदेखील नमूद केलं.

अंजलीचे पाय जमिनीवर
अंजलीने एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती केल्याशिवाय राहात नाही. आज ती एवढी यशस्वी झाली असूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. एका गुणी मुलीचे वडील म्हणून मला तिचा अत्यंत अभिमान वाटतो. संजय शिंदे, अंजलीचे वडील