आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक कुठलेही असो प्रत्येकात प्रयोगशीलता महत्त्वाची- प्रशांत दामले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक वर्षे गारुड करणारा अभिनेता व सध्या नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 14 मे रोजी रात्री 9.30 वाजता कालिदास कलामंदिर येथे नाशिकमध्ये या नाटकाचा प्रयोग होत आहे. आतापर्यंत 10 हजार 500 प्रयोग झालेल्या या नाटकाच्या निमित्ताने या अभिनेत्याच्या प्रवासाबद्दल आमच्या प्रतिनिधी प्रियांका डहाळे यांच्याशी त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा..

नाटकात उत्स्फूर्तता कशी जपता?
- नाटकाचा ‘प्रयोग’ असे आपण म्हणतो, प्रयोग या शब्दातच सारं दडलेलं आहे. प्रत्येक वेळी प्रयोग म्हणूनच मी नाटकाकडे बघतो. मी अनेकदा नाटकामध्ये टायमिंग बदलतो त्यामुळे उत्स्फूर्तपणा टिकून राहतो. त्यामुळे दरवेळी नावीन्य देण्याची ओढ असल्याने प्रयोगशील वृत्तीने काम करणे सहज जमते.

नाशिकमध्ये पहिल्यांदा या नाटकाचा प्रयोग कधी केला?
- प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ओंजळीत घेऊन 2006ला हे नाटक बंद झालं. मात्र, त्यादरम्यान अंदाजे 2005मध्ये हे नाटक मी साधारणत: नाशिकमध्ये आणले होते. पुन्हा या नाटकाचे प्रयोग सुरू करण्यामागे माझ्यातली प्रयोगशीलतेला आव्हान देत पुढील पिढय़ांसमोर हे नाटक करणे हा माझा मुख्य उद्देश आहे.

व्यावसायिक नाटकांकडून प्रयोगशीलता जपली जात नाही?
- नाटक करताना काही प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. मी कुणासाठी प्रयोग करतो? प्रेक्षकांसाठी की माझ्यासाठी? यातून निवड करताना सुवर्णमध्य शोधायला हवा. वैश्विक आशय घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करता येत असेल तर मी जरूर करीन कारण. व्यावसायिक नाटके आणि समांतर नाटके यांच्यातली सीमारेषा अलीकडे पुसट होत चालली असल्याचे एकीकडे चित्र आहे, तर दुसरीकडे अजूनही फरक कायम आहे. पण, अभिनय तर दोन्हीकडे करावा लागतो. त्यात प्रयोगशीलता जपली नाही तर नाट्यरसिकच नाटक समांतर असो वा व्यावसायिक स्वीकारणार नाहीत.

नाशिकमधील नाट्यगृहांबाबत ?
- कालिदास कलामंदिरासारख्या नाट्यगृहात उभे राहून जेवावे लागते ही कलाकारांसाठी वैषम्याची गोष्ट आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही. उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही या विषयावर चर्चा केली. पूर्वी नाशकातलं थिएटर चांगलं होतं. त्यावेळी स्वच्छता होती. एकोस्टिक छान होतं. त्यामुळे नाटक करायला मजा यायची. रंगमंचावर नुसता अभिनय करून उपयोग नसतो त्यासाठी सुव्यवस्था असावी लागते, ती त्याकाळी खरोखरच होती. इथली रंगभूमी विकसित होण्यासाठी नाट्यगृहे अद्ययावत होणे अत्यावश्यक आहे.

रंगभूमी अधिक प्रिय की सिनेमा?
- अर्थात रंगभूमी. रंगभूमीवर माझं पहिलं प्रेम आहे. सिनेमा त्यानंतर आला. मालिकांमध्ये माझं मन फारसं रमत नाही. मराठी सिनेमामध्ये पटकथा अधिक सशक्त होण्याची गरज आहे, तसेच पटकथेबरोबर संवादांची गणितं जुळणं गरजेचं आहे. सिनेमाने शंभरी ओलांडली आहे हे खरं, पण त्याचबरोबर सजग आणि सशक्त मनोरंजन करणारे सिनेमा आणणे ही आता आपली जबाबदारी आहे.