आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यविश्‍व: मराठी रंगभूमी टिकली ती लोकाश्रयावर - नाटककार आळेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगातील प्रत्येक रंगभूमी ही अनुदानावर टिकून असली तरी मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने लोकाश्रयावर टिकून असल्याचे प्रतिपादन प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी केले. संपूर्ण भारतात मराठी रंगभूमीनेच खऱ्या अर्थाने तग धरला असून, ती सातत्याने बदलत असल्यानेच मराठी प्रेक्षकांनीही तिच्याकडे कधीही पाठ फिरवली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासच्या वतीने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमातील अखेरचे पुष्प आळेकर यांनी रविवारी गुंफले.
या वेळी बोलताना आळेकर यांनी नाटक हा समाज जीवनाचा आरसा असल्याचे वाक्य गुळगुळीत वाटत असले तरी तेच सत्य असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात नाटक पाहणं हा एक विधी असून, या कलेचा मराठी माणसाने सदैव अभिमान बाळगलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी नाटकांना करमणूक कर लावण्याचा घेतलेला निर्णय मराठी नाटकांसाठी आजही उपकारक ठरत आहे. एकोणीसाव्या शतकातील नाटक आणि त्यानंतरच्या प्रत्येक काळातील नाटक सातत्याने समाजातील बदल टिपत राहिले. तसेच, आजच्या युगातील नाटकदेखील बदलत असून ते आता अधिकाधिक चटपटीत होत आहे. पूर्वी ब्राह्मणी चेहरा असलेलं नाटक आता बहुजन समाजाच्या जीवनवास्तवाचं दर्शन दाखवू लागलं आहे.
मराठी नाटकांच्या संवेदनांचा केंद्रबिंदू आता पुणे, मुंबईतून बाहेरील महाराष्ट्राकडे सरकला असल्याचे दिसत आहे. या नाटकांच्या कलेसाठी काम करणाऱ्या संस्था कधीही स्वयंभू होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनांनी त्या संस्थेला स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा तिला पुरेसं आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून, आजपर्यंतची सर्व सरकारे त्यात अपयशी ठरली असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी व्यासपीठावर रवींद्र कदम, सुनील ढगे, राजाभाऊ मोगल, आनंद जोशी आदींसह रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय वसंत खैरनार यांनी करून दिला.