आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांचे हिंदीकरण चिंताजनक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आजची पत्रकारिता मोठ्या प्रमाणात बदलली असून, वृत्तांकन करताना आजच्या तरुण पत्रकारांनी बातमीच्या मुळाशी जाऊन बातमीचे लिखाण करण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी माध्यमांचे झालेले हिंदीकरण आणि इंग्रजीकरण चिंतेचा विषय बनली असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी व्यक्त केली.
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते रविवारी सार्वजनिक वाचनालय सभागृहात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन, जयप्रकाश जातेगावकर, बापूसाहेब आकुत, वासुदेव दशपुते उपस्थित होते. यावेळी गोखले यांच्या हस्ते ज्येष्ठ पर्यावरणवादी पत्रकार अभिजित घाेरपडे यांना ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
गोखले पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक आदींनी केलेली पत्रकारिता ब्रिटिशांना हादरून सोडणारी होती. त्या तुलनेत आजची पत्रकारिता भरकटली असून, बातमीच्या मुळाशी जाऊन कोणीही वार्तांकन करायला तयार नाही.

हिंदी वृत्तवाहिन्यांनी मोठ्या प्रमाणात जाळे पसरवले असून, आजच्या तरुण पत्रकारांवर या वाहिन्यांचा मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे मराठी वृत्तपत्रात देखील सर्रासपणे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर होऊ लागला असून, मराठी भाषेचे अक्षरश: मातेरे केले जात आहे. व्हॉट्सअॅपसारख्या आधुनिक सुविधेमुळे पत्रकारिता अगदी सहज सोपी झाली आहे, असेही ते म्हणाले.

एखादी घटना घडली की, पत्रकारांना तात्काळ फोटो आणि बातमी मिळते. त्यामुळे पत्रकार घटनास्थळी जात नाही. पत्रकारांनी असे करता घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन बातमीमागची बातमी देण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
पुरस्काराला उत्तर देताना घोरपडे म्हणाले, आजच्या पत्रकारितेत स्पेशलायझेशन आले आहे. वाचकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. वाचकांना काय पाहिजे याचा प्रामुख्याने विचार हाेऊ लागला आहे.
वाचकांना सोप्या भाषेत समजेल अशा शैलीत बातमीचे लिखाण होणे आवश्यक आहे. टीकात्मक लिखाणाला प्राधान्य देता सकारात्मक बातम्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे घोरपडे यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन नरेश महाजन यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...