आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिनापोटी विद्यापीठांना भुर्दंड, आयोजन लादले गेल्याने सर्वच विद्यापीठे नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचा १० ते १२ लाख रुपयांचा खर्च संबंधित विद्यापीठांच्या माथी मारण्यात आल्याने या विद्यापीठांवर लाखो रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी राज्यभर एका छत्राखाली मराठी भाषा गौरव दिन साजरा व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने एक सूची जाहीर केली आहे. परंतु, त्याशिवाय प्रत्येक विद्यापीठाने कोणत्या संस्थेचा जाहीर कार्यक्रम घ्यावा, याची यादी उच्च व तंत्रशिक्षण खात्यातर्फे ‘लादण्यात’ आल्याने विद्यापीठांत नाराजी व्यक्त होत आहे.
 
दरवर्षी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन -२०१७’ असे स्वतंत्र बोधचिन्ह बनवून राज्यभरातील सर्व कार्यक्रम एका छत्राखाली घेण्याचे ठरवले. त्यानुसार मराठी भाषाविषयक व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, सत्कार इत्यादी कार्यक्रमांची सूची जाहीर केली. त्याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण खात्याने राज्यातील काही सांस्कृतिक संस्थांचे जाहीर कार्यक्रम प्रत्येक विद्यापीठासाठी निश्चित करूनच पाठवले आहेत. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाला या सोहळ्यांच्या आयोजनासाठी किमान १० ते १२ लाख खर्च करावा लागत आहे.
 
कार्यक्रमांची यादी अशी...
मुंबई विद्यापीठास चौरंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास मुंबईतील मिती क्रिएशन्स निर्मित ‘आत्मवाणी अमृतवाणी’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठास अमरावतीच्या अंबा फेस्टिवल ट्रस्टनिर्मित ‘मायमराठी’, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठास रुद्र थिअटर्स निर्मित ‘मराठी अमुचि मायबोली’, एसएनडीटी विद्यापीठास मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘मराठीनामा’, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास पुण्याच्या सुरभी निर्मित ‘बोलू कवतिके’, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास नागपूरच्या जी आर इमेजेस निर्मित ‘कस्तिरीगंधीत मायमराठी’, सावित्रीबाई पुणे विद्यापीठास अडफीज संपनी निर्मिती ‘मराठीची शिदोरी’, सोलापूर विद्यापिठासाठी मनसा निर्मित ‘मऱ्हाटी भाषासुंदरी’, जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी नाशिकच्या दीपक मंडळाची निर्मिती असलेले ‘बोलतो मराठी’, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास लक्ष्मीकांत धोंड निर्मित ‘माय मराठीचा उत्सव’ हे कार्यक्रम आयोजित ‘करण्यास’ सांगण्यात आले आहे.
 
मध्यवर्ती सभागृहाचे बंधन
विद्यापिठांच्या भाषा विभागापुरते हे कार्यक्रम मर्यादित न ठेवता शहराच्या मध्यवर्ती सभागृहात किमान हजार-दोनहजार लोकांपर्यंत पोहोचतील असे आयोजित करण्याच्या सूचना यात होत्या. याचे आयोजन, कलाकारांचे मानधन, पाहुणचार, निमंत्रणे, सभागृह असा सारा खर्च १० ते १२ लाखांच्या घरात जात आहे.  तीन तासांच्या या सोहळ्यात अडीच तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम, पंधरा मिनिटे विद्यापीठासाठी आणि पंधरा मिनिटे महाराष्ट्र शासनासाठी अशी रुपरेषा असणार आहे. विद्यापीठांना याबाबत निवडीचा किंवा निर्णयाचा कोणताही अधिकार नाही, परंतु पैसे विद्यापीठाचे खर्च होणार यामुळे  विद्यापीठांमध्ये नाराजीचा सूर आहे.
 
हा फक्त उत्सवी इव्हेंटबाज कळवळा  : पवार
सरकारला मराठी भाषेची एवढी कळकळ आहे तर तीन वर्ष झाली अद्याप मराठी भाषा धोरण आखले नाही. मराठी भाषा विभागाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले नाहीत. भाषा संचनालयातील अनुवादकासारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त आहेत. मराठीच्या संवर्धनाच्या खऱ्या प्रश्नांना हात लावायचा नाही आणि अशा उत्सवी कार्यक्रमातून कळवळा दाखवायचा हा सरकारचा विरोधाभास आहे. मराठीच्या संवर्धनाचे मूलभूत काम न करता सरकार केवळ दिखाऊ इव्हेंटबाज झाले आहे, अशी प्रतिक्रिया मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी दिली.
 
समिती नेमून संस्थांची निवड : तावडे
फक्त विद्यापीठेच नाही तर सर्वच संस्थांना या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक संस्था आपापले कार्यक्रम घेत असतात. आम्ही फक्त त्यांना एक नाव दिले. लोकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या. एक समिती गठित करून आलेल्या प्रस्तावांमधून संस्था नेमल्या. त्यामुळे या रीतसर पार पडलेल्या प्रक्रियेला हरकत घेण्याचे काहीच कारण नाही, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...