आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटांना माध्यमांतरासह सशक्त संहितेचीही गरज- रत्नाकर मतकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक आणि लेखक रत्नाकर मतकरी यांचा बहुचर्चित, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे. चित्रपटातील कलाकार तुषार दळवी, सुप्रिया विनोद, संदीप पाठक, निर्मात्या प्रतिभा मतकरी यांच्यासह ते बुधवारी नाशकात आले होते. आपल्या या कलाप्रवासाबद्दल त्यांनी ‘दिव्य मराठी’शी साधलेला हा संवाद..

बालनाट्यांचे तुम्ही एके काळी लेखन केले आहे. सध्याच्या बालनाट्याच्या स्थितीबद्दल काय वाटते?
- एके काळी मी ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ यांसारखी नाटके लहान मुलांसाठी लिहिली होती. बालनाट्याकडे आम्ही थिएटर फॉर्म म्हणून बघायचो. खरे तर तो खूप अवघड आहे. त्यामुळे सध्या फारसे कुणी त्याकडे वळत नाहीत. त्यातून अर्थार्जनही महत्त्वाचे आहे. बालनाट्य करताना मुलांच्या बदलत्या विश्वाशी समरस होणेही जमले पाहिजे. ही कसरत पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर यांना जमली.

गूढ कथेत वास्तववादही तुम्ही जपता.
- माझी जगण्याकडे बघण्याची दृष्टीच वास्तवाला धरून आहे. मानवी वृत्तीला धरून गूढकथा लिहिणे हा नेहमीच माझा दृष्टिकोन राहिला. माझ्या गूढकथांमध्ये भय नाही. मात्र, त्या कथांमधील तणाव उत्कंठा वाढवत नेतो. तो सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातला असतो, जगण्याशी निगडित असतो. त्यामुळे सुपरफिशिअल वा दैवी अशा काही बाबी माझ्या गूढ कथांच्या कधीच केंद्रस्थानी नव्हत्या.

वयाच्या 75 व्या वर्षी ‘इन्व्हेस्टमेंट’ काढलात. हा उत्साह कसा जपला?
- सिनेमा तयार करण्याची जागतिक पातळीवरची पद्धत वापरल्याने हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत गेला. नाशिकचे माहेर असलेल्या माझ्या पत्नीने निर्मितीची जबाबदारी घेतली. मुलगी सुप्रियाला प्रभात पुरस्कारासह पाच नामांकने मिळाली. यापेक्षा दुसरे यश ते कोणते? आणखी दोन सिनेमे लिहून तयार आहेत. सर्जनशीलता असली तर निर्मिती करायला उत्साह येतो, असे मला वाटते.

साहित्यकृतीचे माध्यमांतर करण्याच्या पद्धतीबद्दल काय वाटते?
- कादंबरीवर सिनेमा काढणे ही खरे तर नवी गोष्ट नाही. पूर्वी बहुतांश चित्रपट कादंबरीवरच निघत होते. मात्र, त्यावेळची कलात्मक दृष्टी व तसे माध्यमांतर करण्याची कारणे वेगळी होती. आज चांगल्या संहितांची कमतरता आहे. सध्या अनेक चित्रपटांना विषय चांगला असूनही चांगल्या संहिता मात्र लेखकांकडून मिळत नाहीत. त्यामुळे कादंबरीचे सिनेमे काढणे हा ट्रेंड अलीकडे वाढला आहे. मात्र, कादंबरीतील व्हिज्युअल्स तितक्या ताकदीने ओळखता यायला हवीत. माध्यमांतर वाईट नक्कीच नाही; पण ते करताना शब्द आणि दृश्ये यातली कलात्मकता जपता आली पाहिजे. मी तर माझ्याच लेखनाचे माध्यमांतर सर्वाधिक करणारा लेखक आहे. ‘गहिरे पाणी’ ही मालिका असो, वा ‘खोल खोल पाणी’ असो, ‘माझं घर माझा संसार’ही माझ्याच साहित्यकृतीवरून काढला होता. ‘इन्व्हेस्टमेंट’ही माझ्या कथेवर आधारित आहे. त्या पुस्तकाचे नुकतेच रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

विद्यार्थ्यांशीही संवाद
इन्व्हेस्टमेंट चित्रपटाच्या कलाकारांनी बुधवारी विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय तसेच आदर्श बाल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधून चित्रपटाच्या आशयाला अनुसरून आजच्या शालेय पिढीची मानसिकता, पालकांची, शिक्षकांची भूमिका याविषयी आपली मते मांडली.