आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळांनाही हवे आहेत समुपदेशक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धती बदलत असताना इंग्रजी माध्यम शाळांच्या धर्तीवर मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये दुवा साधणा-या समुपदेशकाची गरज निर्माण झाली आहे. काही शाळांनी अशी समुपदेशन शिबिरे आयोजितही केली असून, मुलांच्या करिअरविषयी आग्रही असणा-या पालकांना ती उपयुक्त ठरली आहेत.
शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या (विशेषत: माध्यमिक) शाळांमध्ये समुपदेशक नेमलेला असतो. या पार्श्वभूमीवर मराठी शाळांचेदेखील आधुनिकीकरण होत असताना समुपदेशकाची गरज वाटायला लागली आहे. तसेच, समुपदेशनाव्यतिरिक्त विविध तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरदेखील आयोजित करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. अशी काही शिबिरे शाळांमध्ये पालक मेळाव्याच्या निमित्ताने आयोजितही केली आहेत.
काय असते समुपदेशकाची भूमिका- साधारणत: पहिली ते दहावी वा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्तही अनेक समस्या असतात. वाढत्या वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल यास कारणीभूत असतात. अनेकदा पालकांशी असलेल्या विसंवादाचाही परिणाम मुलांच्या वर्तनावर होत असतो. त्यामुळे त्यांना सौम्य समुपदेशनाची, मार्गदर्शनाची गरज असते. हे काम मानसशास्त्रात पदवी वा शिक्षण घेतलेले तज्ज्ञ करतात.
आपल्याकडील मानसिकतेनुसार पालक सहसा बाहेरच्या समुपदेशकाकडे मुलांना नेणे टाळतात. त्यामुळे पालक-पाल्यातील संवादासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून शाळेत नेमलेला समुपदेशक चांगल्या रीतीने कार्य करू शकतो.
विद्यार्थ्यांना मदत होते - आम्ही समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. धाकामुळे विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधू शकत नाहीत. अशा वेळी समुपदेशक महत्त्वाची भूमिका निभावतो आणि विद्यार्थ्यांना निरोगी मनाने अभ्यास करण्यात मदत होते. - मोहन रंगास्वामी, अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, न्यू एरा स्कूल, गोविंदनगर
नितांत गरज आहे - आमच्या शाळेत शिक्षकच हे काम करतात. सहावी-सातवीच्या मुलींना वाढत्या वयानुसार सामोरे जावे लागणा-या समस्यांसाठी शिबिर वा व्याख्यान आयोजित केले जात नाही. समुपदेशकाची नितांत गरज वाटते. - शिल्पा उशीर, सहशिक्षिका, अभिनव बालविकास मंदिर, इंदिरानगर
मेळाव्यांचे आयोजन करतो - आम्ही कुमार मेळावा, कुमारी मेळावा भरवतो. याशिवाय व्याख्याने आयोजित केली जातात. त्यातून मुलांचे सामूहिकरित्या समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. वैयक्तिक समुपदेशनासाठी शिक्षक नेमले आहेत. तरीही स्वतंत्र समुपदेशक असणे उत्तमच होईल. - दीपा पांडुर्लीकर, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद विद्यालय