आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद करणार दीर्घकाव्यावरील गीताचे महाराष्ट्रभर प्रयोग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शंभर पानांचे दीर्घकाव्य, प्रत्येक उजव्या पानावर चौदा ओळी आणि डाव्या पानावर चार ओळी. इतक्या मोठय़ा कवितेचं गाणं करायचं कसं? पण, दोन वर्षांपूर्वी ‘गारवा’फेम मिलिंद इंगळेने हे साध्य केले आणि ‘तुझ्या टपोर्‍या डोळ्यात माझं इवलंसं गाव’ हा तब्बल 36 मिनिटांच्या गाण्याचा अल्बम आकारास आला.

मुंबईबाहेर पोहोचू न शकलेल्या या अल्बमचे मिलिंद आता महाराष्ट्रभर प्रयोग करणार आहे. त्यामध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकला अग्रक्रमाने प्राधान्य देणार असल्याचे मिलिंदने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. नाशिकबरोबर औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आदी शहरांचादेखील यामध्ये समावेश राहील.

नागपूर येथील प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांचे ‘सखे साजणा’ हे दीर्घकाव्य असून, नांदेड विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमातही हे पुस्तक समाविष्ट आहे. सहा-सात वर्षांपूर्वी मिलिंदच्या वाचनात हे पुस्तक आले आणि त्याने गाणे करायचे ठरवले. पण, इतक्या मोठय़ा कवितेचे आठ गाण्यांमध्ये वर्गीकरण करून त्याचे सौंदर्य घालविण्यासारखे होते. त्यामुळे पाच ते सहा वर्षे त्यावर मेहनत करून निवडक 21 अंतरे निवडले.

लावणीपासून लॅटिन संगीतापर्यंत
या गाण्यामध्ये वैविध्य यावे म्हणून मिलिंदने केवळ एकच संगीतप्रकार न वापरता लावणी, पाश्चात्य संगीत, लॅटिन संगीत असे विविध प्रकार या गाण्यासाठी वापरले. प्रत्येक 14 ओळींनंतर ‘तुझ्या टपोर्‍या डोळ्यात माझं इवलंसं गाव’ या ओळीची पुनरावृत्ती केली. बारीकसारीक तांत्रिक व शाब्दिक रचनांवर काम करून दोन वर्षांपूर्वी हे गाणे गीतकार स्वानंद किरकिरेंच्या हस्ते मुंबईत रिलीज करण्यात मिलिंदने यश मिळवले.

असा असणार कार्यक्रम
दोन ते अडीच तासांचा कार्यक्रम या एका गाण्यावर मिलिंद करणार आहे. नाट्यमय कथेचे रंगमंचावर सादरीकरण करता करता हे 36 मिनिटांचे गाणे मिलिंद सादर करणार आहे.

नाशिकला येण्यासाठी उत्सुक
नाशिकचा प्रेक्षकवर्ग खूप चांगला आहे. कवितेची भक्कम पार्श्वभूमी नाशिकला लाभली आहे. याआधी बर्‍याच वर्षांपूर्वी मी इथे कार्यक्रम केला होता. आता पुन्हा माझा हा अनोखा कार्यक्रम घेऊन नाशिकला येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
- मिलिंद इंगळे, गीतकार, गायक