आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेत मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून पेपर, नाशिकमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. २६) घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गोंधळ उडाला. शहरातील तीन केंद्रांवरील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने त्यांची मोठी अडचण झाली. संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना घेराव घालत पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकारास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापकांसह केंद्र संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश अहिरे यांनी दिले.   
 
नाशिकमधील पेठे विद्यालयासह वाघ गुरुजी शाळेतील केंद्रांवरील सकाळच्या सत्रातील पाचवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. पेठे विद्यालयाच्या केंद्रावरील १०८ विद्यार्थ्यांना  गणित विषयाची प्रश्नपत्रिका मराठीऐवजी सेमी इंग्रजीमधील वाटप करण्यात आली. परीक्षेची संपूर्ण तयारी मराठी माध्यमातून केल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा देताना अडचण झाली. विद्यार्थ्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. मात्र, मराठीच्या प्रश्नपत्रिकाच नसल्याने विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीमधूनच परीक्षा द्यावी लागली.  

दरम्यान, पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेच्या इमारतीतच ठिय्या देत केंद्र संचालकांना जाब विचारला. केंद्र संचालक व पालकांमध्ये वाद झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत पालकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केंद्रांवर धाव घेतली. तसेच दाेषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांना ७५ गुण द्या, नाही तर पुन्हा परीक्षा घ्या, अशी मागणी करत अहिरे यांना घेराव घातला. 

चाळीसगावातही विद्यार्थ्यांचे नुकसान 
नाशिकप्रमाणे चाळीसगावातही असाच प्रकार घडला. शहरातील गुडशेपर्ड शाळेच्या परीक्षा केंद्रावर गाेंधळ उडाला होता. केंद्राध्यक्षांनी मात्र प्रश्नपत्रिका बराेबर असल्याचे सांगितलेे, तर शिक्षणाधिकाऱ्यांनीही उडवीउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार पालकांनी केली अाहे.

पुन्हा परीक्षा घ्यावी..
मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी सेमी इंग्रजीचा पेपर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना सांगूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर देताना अडचणी आल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी -शैला रुईकर, पालक नाशिक.  
 
शाळांकडून  फाॅर्म भरताना झाल्या चुका
शिक्षण विभागाने दिलेल्या पेठे विद्यालयातील केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या यादीनुसार व परीक्षा फाॅर्ममधील माध्यमानुसारच त्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. शाळांकडून अर्ज भरताना चुका झाल्या असाव्यात -हिरामण बागुल, केंद्र संचालक नाशिक. 
 
बातम्या आणखी आहेत...