आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल से’ चालले नाशिककर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या हजारो नागरिकांसमोर प्रख्यात धावपटू मिल्खासिंग यांनी हात उंचावून अभिवादन करताच, त्यांना हजारो हातांनी प्रतिसाद दिला. मिल्खासिंग जीपमधून बसून निर्धारित मार्गावर मार्गक्रमण करू लागताच त्यांच्या मागोमाग जणू नागरिकांचा प्रवाहच वाहू लागला. रविवारी अवघे नाशिक मिल्खामय झाल्याचाच प्रत्यय ‘आरोग्यम् धनसंपदा’ उपक्रमाच्या निमित्ताने नाशिककरांना आला.

जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने श्री साईबाबा हॉस्पिटल आणि ‘मविप्र’ संस्था यांच्यातर्फे आयोजित ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उपक्रमाचे आयोजन केटीएचएम महाविद्यालयापासून करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता मिल्खासिंग यांचे आगमन होताच या तीन किलोमीटरच्या व्यायाम फेरीला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. ‘केटीएचएम’पासून निघालेली ही फेरी पंडित कॉलनीतून शरणपूररोडमार्गे कॅनडा कॉर्नर आणि तिथून जुन्या गंगापूर नाक्यावरून पुन्हा केटीएचएमपर्यंत आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीतील मिल्खासिंग यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. रॅली संपल्यानंतर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांना दररोज व्यायाम, योगा व चालण्याचा व्यायाम करण्यास सांगून हृदय तंदुरुस्तीसाठी टिप्स दिल्या.

मिल्खाभी झीरोसे हीरो बना है : रॅलीनंतर उपस्थितांसमोर बोलताना मिल्खासिंग यांनी मला तुम्ही बोलावल्याचा आनंद असला तरी गत 60 वर्षांत देशात दुसरा मिल्खासिंग निर्माण झाला नसल्याची खंत व्यक्त केली. नाशिकच्या या भेटीनंतर येथून किमान दोन-तीन मिल्खासिंग तयार झाले तरच हा दौरा सफल झाला, असे मानता येईल. धावपटूंनी जितके परिश्रम घ्यायला हवेत, त्याच्या दुप्पट पर्शिम त्यांच्या प्रशिक्षक व पालकांनी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘मिल्खाभी झीरोसे हीरो बना है’ असे सांगत ज्याच्यात जिद्द आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे, त्या प्रत्येकाला भव्यदिव्य कार्य करणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या मान्यवरांचा सहभाग
फेरीत आयोजक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, रतन लथ, अजय बोरस्ते, सचिन महाजन, तुकाराम दिघोळे, कोंडाजी आव्हाड, शोभा बच्छाव, शर्वरी लथ, कविता राऊत, मोनिका आथरे आदींसह मान्यवर सहभागी झाले होते.


चित्रपट पाहून मीदेखील रडलो होतो
माझे आत्मचरित्र मी 45 वर्षांपूर्वीच लिहिले होते. अनेक दिग्दर्शकांनी मोठय़ा रकमा देण्याची तयारी दाखवून कथेचे हक्क मागितले. मात्र, चित्रपटाचा प्रत्येक सीन मी बघेन आणि तो चित्रपट प्रेरणा देणारा असावा, या माझ्या दोन्ही अटी राकेश मेहरा यांनी मान्य केल्यानंतर मी त्या चित्रपटाच्या कथेचे हक्क अवघ्या एक रुपयात दिले. चित्रपटात माझ्या बहिणीचा प्रसंग प्रथमच पाहताना मी प्रचंड रडलो. त्या वेळी शेजारीच बसलेल्या फरहान अख्तर यांनी त्यांचा रुमाल दिल्याची आठवण मिल्खासिंग यांनी या वेळी सांगितली.