आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Vidya Prasarak Architecture College Permission Cancel Nashik

महाविद्यालयाची मान्यता केवळ आकसापोटीच रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मविप्रच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची मान्यता केवळ आकसापोटीच रद्द केली असून, अन्य महाविद्यालयांच्या बाबतीत केंद्रीय कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने नियमांकडे काणाडोळा केल्याचा आरोप संस्थेचे सभापती नितीन ठाकरे यांनी केला आहे. संस्थेने कौन्सिलचे नियम व अटींची पूर्तता केली नसल्याचा टोलाही त्यांनी लगावल्याने संस्थेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ठाकरे म्हणाले की, आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पूर्वी विजय सोहनी होते. तेच बरीच वर्षे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्षही होते. स्व. डॉ. वसंत पवार यांच्याशी वाद झाल्यानंतर सोहनी यांनी गोव्यात स्वत:चे आर्किटेक्चर महाविद्यालय सुरू केले. त्याच आधारावर ते कौन्सिलचे अध्यक्ष झाले. निवडणुका न झाल्याने निर्धारित काळापेक्षा जास्त काळ ते पदावर राहिले. याच वेळी त्यांनी मविप्रच्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासाठी कागदपत्रे जमवू लागले. कौन्सिलच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयात पीएचडीधारक प्राध्यापक असणे अनिवार्य आहे. परंतु, आर्किटेक्चर शाखेत पीएचडीधारक अत्यंत कमी आहेत. इतरही अनेक महाविद्यालयात ते नाहीत, तरीही ती सुरू असल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

सोहनी यांनीच जे. जे. स्कूल ऑफ आर्टची परवानगी रद्द करण्याची किमयाही केल्याचे ठाकरे म्हणाले. कौन्सिलचे विद्यमान अध्यक्षही त्यांचेच निकटवर्तीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे असून, त्यांना इतर महाविद्यालयात स्थलांतरित करण्यासाठी किंवा सध्याच्या महाविद्यालयात पदवीपर्यंत कायम ठेवण्यासाठी कौन्सिलकडे प्रयत्न सुरू करावे लागणार आहेत. प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही ठाकरे यांनी दर्शवली.