आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमधील संजूबाबाचा मार्शल आर्ट क्लब लांबणीवर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिककरांना मिक्स्ड मार्शल आर्टचे धडे देण्यासाठी मसलमॅन संजय दत्तचा क्लब महिनाभरात शहरात सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या निर्णयानंतर संजूबाबा अडचणीत आला. त्यामुळे हा क्लब निर्धारित वेळेत सुरू होणार का, असा प्रश्न केला जात आहे.

उद्योगपती राज कुंद्रा अध्यक्ष आणि संजय दत्त उपाध्यक्ष असलेल्या ‘सुपर फाईट प्रमोशन्स प्रा. लि.’ ही संस्था हा क्लब नाशिकमध्ये सुरू करणार असल्याची माहिती क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी दिली. कॉलेजरोड परिसरातील वडनगरे लेन येथील एका इमारतीत त्यासाठी जागेची निश्चितीही करण्यात आली आहे.

महिनाभरात तेथील इंटेरियर आणि साहित्य उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा क्लब सुरू होणार आहे. संजय, राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या उपस्थितीत या क्लबचे उद्घाटन होणार असल्याची चर्चाही आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर संजूबाबाच अडचणीत आल्याने सध्यातरी या क्लबच्या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

काय आहे मिक्स्ड?

या क्लबमध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट हा जगभरात सध्या वेगाने विकसित होणारा संरक्षण प्रकार शिकवला जाणार आहे. त्यात बॉक्सिंगसह मार्शल आर्टच्या विविध प्रकारांचा संगम आहे. 1970च्या दशकात मार्शल आर्टची क्रॉस ट्रेनिंगला परवानगी नव्हती; पण ब्रूस लीने हे नियम तोडत विविध प्रकारच्या मार्शल आर्टचा आपल्या खेळात समावेश केला. लीच्या म्हणण्यानुसार, उत्तम फायटर केवळ बॉक्सर, कराटे किंवा ज्युडोमॅन नसतो तर विविध प्रकारांचा वापर करणारा तो बॉक्सर असतो. राज व संजय यांनी खेळाचा हा नवा प्रकार भारतात सादर केला. त्यासाठी सुपर फाईट प्रमोशनची स्थापना करण्यात आली. इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगचे पदक मिळवणारी मेरी कोम या खेळाची ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहे.