Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Martyred IAF Commandos Were Part Of First Batch Of Garud Personnel To Be Attached To Army

शहीद मिलिंद यांच्या अंत्ययात्रेत 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा; वीरपुत्राला निरोप देताना तापीकाठही गहीवरला

जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झालेले मिलिंद किशोर खैरनार यांचे पार्थिव वायुसेनेच्या विमानाने ओझर येथे आ

प्रतिनिधी | Oct 13, 2017, 10:21 AM IST

नंदुरबार-जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत वायुदलाचे शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव असलेल्या बोराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वायुदलाच्या जवानांनी हवेत २१ फैरी झाडून मानवंदना दिली. शहीद खैरनार यांच्या अंत्यसंस्काराला साक्री, दहीवेल तसेच नंदुरबार जिल्ह्यातून सुमारे १० हजार नागरिक उपस्थित होते. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला. शहीद मिलिंद यांच्या आई सुनंदा खैरनार यांना भावना अनावर झाल्या. “मिलिंद आमच्यासाठी जन्माला आलाच नव्हता. तो देशाचा हिरा होता. तो आला आणि चमकून निघून गेला. त्याने देशाची सेवा केली...’ अशा शब्दांत वीरमातेने भावना व्यक्त केल्या.
साक्रीकरांकडून वीरपुत्र मिलिंद खैरनार यांना श्रद्धांजली
खान्देशचा वीर सुपुत्र मिलिंद खैरनार यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनातून नाशिकहून त्यांच्या मूळगावी बोराळे येथे रवाना झाले आहे. यादरम्यान साक्री येथे वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मिलिंद यांचे साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झाले. साक्री येथे काही वेळ अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात आले होते. यावेळी अवघे साक्री शहर आणि परिसर या वीर सुपुत्राला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी एकवटला होता.

न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात मिलिंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत सर्व विद्याथ्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी विविध संघटना तसेच सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे उपस्थित होते.

अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत मिलिं खैरनार यांना आले वीरमरण...
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे २ गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात २७ वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले आहेत. याआधी २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यात एक गरुड कमांडो शहीद झाला होता.

हाजिन भागात ३ ते ५ अतिरेकी लपल्याचे कळल्यानंतर पोलिस, विशेष पथक व लष्कराने पहाटे ५ला मोहीम राबवली. वायुदलाचे गरुड कमांडोही या अभियानात अनुभव व प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर गरुड कमांडो घडतात. अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज या दलाला हवाई हल्ला, शत्रूंचा माग काढणे, हवाई आक्रमण, स्पेशल कॉम्बॅट आणि बचाव मोहिमांसाठी तयार केले जाते.

बोराळे गावावर शोककळा
नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील रहिवासी व वायुसेनेतील जवान मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या मृत्यूने बोराळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे वडील किशोर खैरनार हे वीज वितरण कंपनीत ऑपरेटर होते. निवृत्त झाल्यानंतर ते नाशिक येथे स्थायिक झाले.

मुलगा शहीद झाल्याचे वृत्त कळताच ते नंदुरबारकडे निघाले आहेत. मिलिंदचे वडील व अाई सुनंदा हे दाेन महिने त्याच्या घरी चंदिगडला राहिले. मात्र मिलिंद सीमेवर तैनात असल्यामुळे त्याची भेट न हाेताच ते मंगळवारी नाशिकला परतले हाेते अाणि बुधवारी त्यांना ही दु:खद घटना कळाली.

बोराळे (ता.नंदुरबार) येथे जन्मलेल्या मिलिंद यांचे शिक्षण दहिवेल, निजामपूर, साक्री तसेच धुळे येथे झाले. १६ डिसेंबर २००२ रोजी ते वायुसेनेत भरती झाले. दिल्ली, पश्चिम बंगालमधील कलाईकोंडा, गुजरातमधील नलीय या भागात पोस्टिंग झाल्यानंतर ते सध्या चंदिगड येथे गरुड कमांडो पदावर सेवारत होते. बुधवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या वेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात मिलिंद खैरनार शहीद झाले. घटनेचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. मिलिंदला कृष्णा नावाचा दोन वर्षांचा मुलगा आणि वेदिका नावाची चार वर्षांची मुलगी आहे. पत्नीचे नाव हर्षदा आहे. पत्नी व मुले हे चंदिगडला हेडक्वार्टरला राहतात.

धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात काही काळ मिलिंद यांनी वास्तव्य केले होते. त्याच्या शहीद झाल्याच्या वृत्तामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. ​तहसीलदार संदीप भोसले यांना संदेश मिळाल्यानंतर या जवानाच्या नातलगांचा व रहिवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनीही साक्रीत या जवानाच्या पत्त्यावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... शहीद मिलिंद खैरनार यांच्या अंत्यसंस्कार आणि फॅमिलीचे फोटो

Next Article

Recommended