आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिका: महापौरपदासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस दुरंगी सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करून महापौर उपमहापौरपदासाठी उमेदवार दिल्यामुळे आता दुरंगी मात्र भाजपच्या दृष्टीने एकतर्फी लढत होणार आहे. दुसरीकडे मनसेने तटस्थ तर शिवसेनेने मतदानाची वेळ आली तरी तटस्थ राहून विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महापौर उपमहापौरपदासाठी १४ मार्च रोजी निवडणूक असून, भाजपला १२२पैकी ६६ जागा मिळाल्यामुळे त्यांचे बहुमत निर्विवाद आहे. 

महापौर उपमहापौरपदासाठी ६२ मॅजिक फिगर असून, बहुमताचा आकडा गाठल्यामुळे भाजपकडून तब्बल पाच टर्म नगरसेवक राहिलेल्या रंजना भानसी यांना महापौरपद, तर उपमहापौरपद प्रथमेश गिते यांना देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दोघांनी शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्यासह विद्यमान नगरसेवक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादीने संख्याबळ कमी असले तरी, निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
 
काँग्रेसने महापौरपदासाठी आशा तडवी, तर राष्ट्रवादीने सुषमा पगारे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे तर काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान दोन्ही पदासाठी भाजप विरुद्ध काँग्रेस आघाडी असा सरळ सामना राहणार आहे. दरम्यान सेनेने विरोधीपक्षाच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय घेत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेने मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
दत्तक नाशिकवर सेनेचा पहारा : शिवसेनेने३५ नगरसेवकांसह विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून, शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये अनुभवी जुनेजाणते नगरसेवक असल्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख ठरणार आहे. दरम्यान, महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिक घेत असल्याच्या अाश्वासनाला साद देत नाशिककरांनी भाजपला भरभरून साथ दिली अाता त्याप्रमाणे खराेखरच नाशिकचे पालन पाेषण हाेते की नाही यावर पहारा देण्याचे काम सेनेचे ३५ नगरसेवक करतील असा चिमटा घेतला. दरम्यान, सेनेसाेबत काँग्रेस राष्ट्रवादीत जुनेजाणते नगरसेवक असल्यामुळे यंदा विरोधी पक्षाचीधारही कडक असणार आहे. खासकरून राष्ट्रवादीकडून गजानन शेलार, काँग्रेसचे शाहू खैरे, अपक्ष तथा विद्यमान उपमहापौर गुरुमित बग्गा, मनसेकडून गटनेते सलीम शेख, महापौर अशोक मुर्तडक असे दिग्गज असणार आहेत. 

विरोधी पक्षाची भूमिका बजावणार 
शिवसेनेला जनाधार मान्य असून विरोधी पक्षाची प्रखर भूमिका बजावू. निव्वळ विरोधाला विरोध असे राजकारण राहणार नाही - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना. 
 
सर्वांना सोबत घेऊन कामकाज 
जनतेने स्पष्ट कौल दिल्याने भाजपने दोन्ही पदासाठी अर्ज दाखल केला. सर्वांना सोबत घेऊन कामकाज करण्याचा प्रयत्न आहे. जे येतील त्यांचे स्वागत. - अा.बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष
 
बातम्या आणखी आहेत...