आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी आता ‘समझोता एक्स्प्रेस’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी व महापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया जवळपास एकाच टप्प्यात येत असल्याचे बघून आता अनेकांनी दोन्ही थडींवर हात ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी आता महापौरपद मिळाले तर मतदारसंघावरील दावा सोडण्याची तयारी दर्शवल्याने चुरस वाढणार आहे. खासकरून शिवसेना, भाजप व मनसे या तीन पक्षांमध्ये त्यासाठी मोठी खलबते सुरू झाली आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर महापौरपदाची निवडणूक होणार असल्याने इच्छुक नगरसेवकांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेकडून नाशिक मध्यमध्ये अजय बोरस्ते, सचिन मराठे, तर नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी असे नगरसेवक तयारीला लागले होते. प्रामुख्याने याच तडजोडीतून शिवसेना व भाजपात संभाव्य मतदारसंघाच्या फेरबदलाबाबतही निर्णय होऊ शकतो किंवा तिढा सुटला तर गतवेळीप्रमाणेच जागा राहण्याची शक्यता आहे. मनसेकडून नाशिक पूर्वमध्ये रमेश धोंगडे, अशोक मुर्तडक, अशोक सातभाई, तर पश्चिममधून शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे आदी इच्छुक आहेत. भाजपचा विचार केला तर नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, दामोधर मानकर, तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, दिनकर पाटील असे उमेदवार तयारीला लागले आहेत. महापौरपदासाठी संधी मिळाल्यास संबंधितांनी विधानसभेसाठी दावा मागे घेण्याची तयारी चालवली आहे. त्यातून तिन्ही पक्षांत आता समझोता एक्स्प्रेसही वेगात दाखल होऊ लागली आहे. यापूर्वी ओबीसीबरोबरच सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होते. प्रदीर्घकालापासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षण नव्हते.
उपमहापौरपद भाजपसाठी महत्त्वाचे
संख्याबळ कमी असूनही भाजप किंगमेकर ठरेल. सेनेच्या मदतीने भाजप पुन्हा सत्तेत सहभागी होईल, असे चित्र आहे. दरम्यान, अल्प जागांमुळे सेनेने महापौरपदावर दावा केल्यास भाजप उपमहापौरपदासाठी विधानसभेसाठी इच्छुकांना थांबवण्याच्या तयारीत आहे.